दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभाग राबवणार ‘हा’ नवीन प्रयोग


मुंबई – विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या पालकांसाठी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हा चिंतेचा विषय ठरत आहे. पण, यावर आता शिक्षण विभागाने नवीन तोडगा काढला आहे. आता पहिली ते 7 वी इयत्तेपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. तसेच 3 महिन्यामध्ये शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम 1 किंवा 2 पुस्तकांमध्ये तयार करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांमधील पुस्तकांची संख्या कमी होणार आहे. परिणामी दप्तरांचे ओझेही कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिक पातळीवर हा प्रयोग राबवणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरातील शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतली. या बैठकीत सर्व विषयांचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात येणार असल्याची चर्चा झाली. यासंदर्भातील वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.

सध्या प्रत्येक विषयांची 3 स्वतंत्र पुस्तके असल्यामुळे या तिन्ही विषयाची पुस्तके विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जावे लागते. परंतु, आता शिक्षण विभागाच्या नवीन प्रयोगानुसार, 3 ते 4 विषयांचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. असा प्रयोग ठाणे महानगरपालिकेतील शाळेमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. राज्यातील इतर शाळांमध्येही हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राबवण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment