न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार शिखर धवन


नवी दिल्ली: भारतीय संघाने पिछाडीवर असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला. भारतीय संघाचा न्यूझीलंड दौऱ्याआधी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरला. पण आता टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच बाबतीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तर भारतीय संघाची फलंदाजी सर्वात मोठी ताकद आहे. पण आता न्यूझीलंड दौऱ्याला भारताचा सलामीवीर शिखर धवन मुकण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री न्यूझीलंडसाठी भारतीय संघ रवाना झाला आणि धवनला न्यूझीलंडला जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले.

गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषत स्पर्धेदरम्यान शिखरचा अंगठा फॅक्चर झाला होता. तर त्याच्या गुडघ्यांना सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत दुखापत झाली होती आणि त्याला २७ टाके पडले होते. त्यानंतर शिखरने पुनरागमन करत चांगली फलंदाजी केली होती. शिखरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात अनुक्रमे ७४ आण ९६ धावा केल्या होत्या.

धवनच्या ऐवजी संघात बीसीसीआयकडून कोणत्या खेळाडूला स्थान मिळेल याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. भारताचा अ संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. अ संघातील एखाद्या खेळाडूचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे. शिखर धवनच्या जागी मयांक अग्रवालचा संघात समावेश होऊ शकतो. आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या संघात मयांकचा समावेश होता. त्याच बरोबर शिखरची जागा सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे देखील घेऊ शकतात. या दोघांनीही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

भारताचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात अ‍ॅरोन फिंच याने मारलेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत असताना शिखर जखमी झाला. यानंतर शिखरला मैदान सोडावे लागले आणि तो फलंदाजीसाठी देखील आला नव्हता.

Leave a Comment