सिलीअॅक डिसीज कसा ओळखावा?


गव्हाची पोळी, पिझ्झा, पास्ता, केक, ब्रेड, बिस्किटे, कुकीज, या सर्व अन्नपदार्थांमध्ये एक गोष्ट समान आहे.. या सर्व अन्नपदार्थांमध्ये ग्लुटेन आहे. आजकाल ‘ग्लुटेन फ्री’ अन्नपदार्थ सर्रास पाहण्यास मिळत आहेत आणि लोकप्रियही होत आहेत. याचे कारण असे, की काही व्यक्तींना ग्लुटेन मुळे अॅलर्जी होत आहेत, तर काही व्यक्ती केवळ ‘ग्लुटेन फ्री’ अन्नपदार्थ ‘ हेल्दी ‘ असल्याने त्यांचे सेवन करीत आहेत.

काही व्यक्तींना अन्नामधून थोडे जरी ग्लुटेन शरीरामध्ये गेले तरी खूप त्रास होतो. अश्या वेळी हा त्रास ग्लुटेन अॅलर्जी मुळे आहे, किंवा या मागे अजून काही गंभीर कारण आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. ग्लुटेनचे सेवन केले गेल्याने होणारा हा त्रास सिलीअॅक डिसीजचे लक्षणही असू शकतो. सिलीअॅक डिसीज आणि ग्लुटेनच्या अॅलर्जी मुळे होणारा त्रास जरी साधारण एकसारखा असला, तरी हे दोन्ही विकार एकमेकांपासून वेगळे आहेत. या आजारांमधील सर्वात महत्वाचा फरक म्हणजे सिलिअॅक डिसीज अनुवांशिक असतो, तर ग्लुटेन किंवा ‘ व्हीट अॅलर्जी ‘ कोणालाही होऊ शकते. तसेच ग्लुटेन अॅलर्जीच्या मानाने सिलीअॅक डिसीज जास्त गंभीर आहे.

ग्लुटेन असलेले अन्नपदार्थ सेवन केल्याने लहान आतड्याला होणारे नुकसान म्हणजे सिलिअॅक डिसीज. ज्या पदार्थांमध्ये कर्बोदके अधिक, त्या पदार्थांमध्ये ग्लुटेन असते असा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. खरेतर ग्लुटेन गहू, राय आणि बार्ली ( जव ) या धान्यांमध्ये अधिक असते. त्याशिवाय काही औषधे, सौंदर्यप्रसाधने यांच्यामध्ये ही ग्लुटेन असू शकते.

सिलिअॅक डिसीजची लक्षणे सर्वच रुग्णांमध्ये एक सारखी नसतात. तसेच लहान मुले आणि प्रौढांमध्येही लक्षणे वेगवेगळी असतात. ग्लुटेन असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने पोट बिघडणे आणि उलट्या होणे हे या रोगाचे सर्वसामान्य लक्ष आहे. तसेच पोट फुगणे, पोटामध्ये वात होणे ( गॅसेस ) आणि पोट अतिशय दुखणे ही देखील या रोगाची लक्षणे असू शकतात.

सिलीअॅक डिसीजचा थेट परिणाम आतड्यांवर होत असल्याने अन्नामधील पोषक घटक आतड्यांद्वारे शरीरामध्ये शोषले जात नाहीत. परिणामी शरीराला आवश्यक पोषण न मिळाल्याने वजन घटण्यास सुरुवात होते. तान्ह्या मुलांमध्ये या कारणाने वाढ अपुरी आणि उशिरा होते, तर तरुण मुलांमध्ये उंची कमी असणे, किंवा उशिरा वयात येणे असे या रोगाचे परिणाम दिसू लागतात.

सिलीअॅक डिसीज असलेल्या प्रौढ रुग्णांना सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच या रोगामुळे शरीराला आवश्यक ती पोषक द्रव्ये मिळत नसल्याने हाडेही ठिसूळ होऊ लागतात. त्याचप्रमाणे निरनिराळे त्वचा रोग उद्भविण्याचीही शक्यता असते. या रोगामुळे कोपरे, गुडघे, पाठ, किंवा डोक्यामध्ये खाज सुटून त्वचेवर लालसर चट्टे उठू लागतात. सिलीअॅक डिसीज असणाऱ्या दहा टक्के रुग्णांमध्ये त्वचेशी संबंधित तक्रारीही पहावयास मिळतात.

या शिवाय सतत थकवा जाणविणे, हातापायांना सतत मुंग्या येणे, तोंडामध्ये अल्सर्स येणे, सतत तोंड कोरडे पडणे, डोकेदुखी, ही देखील सिलीअॅक डिसीजची लक्षणे असू शकतात. सिलीअॅक डिसीजमुळे उद्भविणाऱ्या लक्षणांवर औषधोपचार करता येत असले, तरी मुळात हा रोग नियंत्रित ठेवण्यासाठी ग्लुटेन फ्री अन्नपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment