सामान्य आजारांसाठी घरगुती उपचार


दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये तब्येतीच्या काही ना काही कुरबुरी सुरु असणे ही काही मोठी बाब नाही. प्रदूषण, वेळी अवेळी खाणे, अपुरी झोप, बदलते हवामान, सततची धावपळ इत्यादी कारणांमुळे लहान सहान आजार उद्भवत असतात. या आजारांसाठी करता येण्यासारखे घरगुती उपचारही आपल्याकडे परंपरेने चालत आले आहेत. पण हे घरगुती उपचार अगदी प्राथमिक स्वरूपाचे उपचार असून, वैद्यकीय सल्ला घेईपर्यंत पर्याय म्हणून अवलंबायचे आहेत. आजार बळावू नये, किंवा संपूर्ण बरा व्हावा या करिता वैद्यकीय सल्ला घेणे अगत्याचे आहे.

जर अचानक दातदुखी सुरु झाली, तर जो दात दुखतो आहे, त्यावर कांद्याचा एक लहानसा तुकडा ठेवावा. जर दातांमध्ये काही इन्फेक्शन असेल, तर कांद्यातील अँटी बॅक्टेरियल तत्वे इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतील. जर चेहऱ्यावर किंवा त्वचेवर कुठे ही मुरुमे ( पिंपल्स )येत असतील, तर एक चमचा कोथिंबीरीच्या किंवा पुदिन्याच्या पानांच्या रसामध्ये एक चिमूटभर हळद घालावी. चेहरा स्वछ धुवून घेऊन मग त्यावर हा रस लावावा आणि रात्रभर चेहऱ्यावर राहू द्यावा. ह्या उपायाने काही दिवसातच मुरुमे कमी होताना दिसतील, आणि नवीन मुरुमेही येणार नाहीत.

कित्येकदा उष्णतेने किंवा अन्य कुठल्या कारणाने तोंड येते, किंवा तोंडामध्ये अल्सर्स होतात. ओल्या नारळातील खोबरे खाल्ल्याने अल्सर्स कमी होतात. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये अँटी बॅक्टेरियल तत्वे असतात, त्यामुळे अल्सर्स बरे होण्यास मदत मिळते. तसेच नारळाचे दूध काढून घेऊन त्याने चुळा भरल्यास ही आराम मिळतो.

पाणी कमी प्यायल्याने किंवा प्रवासामध्ये अस्वच्छ शौचालये वापरावी लागल्याने कित्येकदा युरीन (लघवीचे) इन्फेक्शन होते. हे इन्फेक्शन लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनाही होऊ शकते. युरीन इन्फेक्शन झाल्याने लघवीस आग होऊन इन्फेक्शनचे प्रमाण वाढल्यास ताप ही येऊ शकतो. ह्या इन्फेक्शनसाठी उपचार म्हणून भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दिवसातून दोन वेळा नारळाचे ताजे पिण्याने ही गुण येतो. साधे पाणी पिताना, ते हलकेसे कोमट करून प्यावे.

वेळी अवेळी जेवणे, सतत बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे, किंवा आहारामध्ये प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे प्रमाण जास्त असणे इत्यादी गोष्टींमुळे बद्धकोष्ठाचा त्रास उद्भवतो. या करिता रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा जिरे पाण्याबरोबर घ्यावेत. तसेच सकाळी उठल्यावरही एक चमचा जिरे कोमट पाण्याबरोबर घ्यावेत. थोडास ओवा कोरडाच तव्यावर भाजून घ्यावा आणि त्यामध्ये किंचित मीठ मिसळून खावा. त्यावर कोमट पाणी घ्यावे. त्याने ही बद्धकोष्ठ दूर होण्यास मदत होते.

एखाद्या औषधाच्या सेवनामुळे, दातांमध्ये किंवा हिरड्यांच्या इन्फेक्शनमुळे, धूम्रपान किंवा मद्यपानामुळे तोंडामधून श्वासाची दुर्गंधी उद्भवू शकते. ही दुर्गंधी कमी करण्याकरिता तोंडामध्ये लवंग चघळावी, किंवा आल्याचा लहानसा तुकडा तोंडात धरावा. मधात आले मिसळून त्याचे सेवन केल्यासही तोंडातील श्वासाची दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळते. सर्दीमुळे नाक सतत बंद राहिल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. अश्या वेळी तव्यावर काळ्या मिरीचे चार दाणे गरम करून त्यातून आलेली वाफ घेतल्याने नाक मोकळे होण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या वेळी काही महिलांना पोटदुखीचा त्रास होतो. ह्या पोटदुखीवर उपाय म्हणून सकाळी चार – पाच बेदाणे अर्ध्या तासाकरिता गरम पाण्यामध्ये भिजत घालावेत. त्यानंतरहे पाणी प्यावे व त्यामध्ये भिजविलेले बेदाणे खावेत. हा उपाय रिकाम्या पोटी करावयाचा आहे. त्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो. तसेच रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधामध्ये पाव लहान चमचा दालचिनीची पूड घालून प्यावे. त्याने ही पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment