न्यायालयाने दिले डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश


पुणे : विशेष न्यायालयाने पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा आदेश दिले असून डीएसकेंच्या जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय तसेच राज्य सरकारने जाहीर नोटीस काढावी असे या आदेशात म्हटले आहे. डीएसके आणि त्यांची पत्नी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरूंगात आहेत.

दरम्यानच्या काळात डीएसके आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या एकूण ४६३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात स्थावर आणि जंगम मालमत्तांचा समावेश आहे. डीएसकेंवर २००० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर त्यांनी कर्जदात्या बँकांसह सुमारे ३३००० गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे ठेवीदार तसेच बँकांचे पैसे परत मिळावेत यासाठी डीएसकेंच्या जप्त संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत हरकती नोंदवण्यासाठी देण्यात आली आहे. दरम्यान येत्या १५ फेब्रुवारीला डीएसकेंकडून जप्त करण्यात आलेल्या तेरा आलिशान गाड्यांचा लिलाव होणार आहे. डीएसके यांच्याकडील ४६ पैकी २० वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची किंमत दोन कोटी ५७ लाख ५० हजार रुपये एवढे आहे.

Leave a Comment