डिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला


डिप्रेशन म्हणजेच मानसिक नैराश्य घालवण्यासाठी एक तर मानसोपचार तरी घेतले जातात किंवा औषधे घेतली जातात. त्यामुळे मनस्थिती तात्पुरती सुधारते पण पुन्हा मूड जातो तो औषध घेतल्यानंतरच येतो. तेव्हा खर्‍या अथार्र्ने तणाव आणि नैराश्यविरहित जगणे जगायचे असेल तर मुळात आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. मन:स्थिती बदलली पाहिजे कारण शेवटी नैराश्य हा मनाचा विकार आहे. मनावर उपचार करणेच यात मूलभूत आहे. आजकाल विद्यार्थ्यांना आणि पौगंडावस्थेतल्या मुलांना आणि मुलींना हा विकास सतवायला लागला आहे. तेव्हा पालकांनी या मुलांना चांगल्या सवयी लावून हा विकार नियंत्रणात ठेवण्यास शिकवले पाहिजे. त्यासाठी खालील सवयींवर पालकांनी लक्ष केन्द्रित केले पाहिजे.

बदलायची पहिली सवय म्हणजे उगाच विचार करीत बसणे. तसेच गैरमार्गाने काम करणे. यातून तणाव वाढतो. काही लोकांना एकांतात बसून नको ते विचार करत राहण्याची सवयच लागलेली असते. एकटाच निरर्थक विचार करीत बसण्याने तणाव वाढतो. या सवयीच्या बेडीतून बाहेर पडून समाजात मिसळायला लागलो की अनेक नवे नवे विचार समोर येतात आणि त्यातून मनाला येणारे नैराश्य कमी होते. तेव्हा स्वत:ला घरात कोंडून घेऊ नका. बाहेर पडा. एखादा छंद जोपासा. त्यात रमून जा. त्याचा निराशेने झपाटलेल्या लोकांना दिलासा मिळतो. घराबाहेर पडून कोणाला बोलावे आणि कोणात मिसळावे असा काही प्रश्‍न पडला असेल तर घराबाहेर पडून चालत रहा. दहा ते पंधरा मिनिटे चाललात आणि निसर्गाच्या सान्निध्यात वावरलात की आपोआपच मनावर साचलेली धूळ झटकली जाईल.

नैराश्याखाली जगणारे लोक व्यसनांच्या आहारी जाऊन आपले एक वेगळे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण ते जोपर्यंत या जगात आहेत तोपर्यंत त्यांना आपले नैराश्य विसरले असल्याचा भास होतो पण एकदा त्या व्यसनांची नशा उतरली की पुन्हा मनाला निराशा घेरायला लागते. त्यातून दोन समस्या निर्माण होतात. पहिली म्हणजे एक़दा नशा उतरल्यानंतर निराशा मनाचा ताबा अधिक तीव्रतेने घेते. मग ही व्यक्ती पुन्हा पुन्हा व्यसनांकडेच वळायला लागते. त्यातून व्यसनांवरचे अवलंबन वाढते आणि व्यसनाच्या धुंदीतून बाहेर पडायलाच नको वाटते. व्यसनातून काही शारीरिक समस्या निर्माण होतात त्या वेगळ्याच. नैराश्यावरचा आणखी एक उपाय म्हणजे लवकर झोपून लवकर उठा आणि साधारणत: ताजे, गरम, सात्विक अन्न खा. याचाही नैराश्य कमी व्हायला लाभ होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment