आंध्र प्रदेश तीन राजधानी असलेले देशातील एकमेव राज्य


नवी दिल्ली – सोमवारी विधानसभेत आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांचे विधेयक मंजुर करण्यात आले. यापूर्वी या विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आल्यानंतर हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. सोमवारी आवाजी मतदानाने हे विधेयक मंजुर करण्यात आले. आता या विधेयकानुसार विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी, अमरावती विधीमंडळ तर कुरनूल ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असेल.

विरोधकांकडून या विधेयकाला जोरदार विरोध करण्यात आला होता. त्याचबरोबर चर्चेदरम्यान गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई करत त्यांना दिवसभरासाठी अध्यक्षांनी निलंबित देखील केले होते. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याविरोधात आंदोलन केले. पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.

यादरम्यान जय अमरावतीची घोषणाबाजी काही आमदारांनी केल्याचे पहायला मिळाले. आमदारांवर अध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर विधानसभेबाहेर पायऱ्यांवर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन केले. पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी यापूर्वीही तीन राजधान्यांच्या प्रस्तावाचा जोरदार विरोध केला होता. आज आंध्र प्रदेशच्या इतिहासातील काळा दिवस आहे. जगातील कोणत्याही देशांमधील राज्यांना तीन राजधान्या नाहीत. आम्ही अमरावती आणि आंध्र प्रदेशला वाचवू इच्छित असल्याचेही ते म्हणाले होते.

Leave a Comment