धोनीने दिउडी मातेला पुन्हा घातले साकडे


टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याचे क्रिकेटमधील भविष्य सध्या अधांतरी बनले आहे. अर्थात तो सध्या रांची येथेच असून झारखंड टीमसाठी सराव करतो आहे. सोमवारी त्याने त्याचा अतूट विश्वास असलेल्या तमाड येथील दिउडी माता मंदिरात दर्शन घेऊन पूजा केल्याचे समजते. या देवीवर धोनीची खुपच श्रद्धा आहे. तो नेहमीच या मंदिरात दर्शनासाठी येतो. धोनी आल्याचे समजताच या मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांनी धोनीबरोबर सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही महत्वाच्या स्पर्धा, सिरीज अथवा दौऱ्यासाठी घराबाहेर पडताना धोनी येथे दर्शनासाठी येतो. १९९८ मध्ये तो रणजी खेळाला तेव्हापासूनच धोनी हा रिवाज पाळतो. सध्या तो आयपीएल साठी सराव करत आहे म्हणून दर्शनाला आला होता असे सांगितले जात आहे.

धोनीने टीम इंडियाचा कप्तान असताना २०११च्या वर्ल्ड कप पूर्वी याच मंदिरात येऊन विशेष पूजा केली होती आणि नवस बोलला होता. जेव्हा वर्ल्ड कप भारताने जिंकला तेव्हा धोनीने येथे येऊन केस कापले होते. तसेच वर्ल्ड कपच्या फायनल मॅचच्या दिवशी या मंदिरात विशेष पूजा करण्यासंबंधी सूचना केल्या होत्या असेही सांगतात.

या मंदिरातील देवीची मूर्ती साडेतीन फुट उंचीची आणि काळ्या पथ्थरातील असून सिह्भूमचा मुंडा राजा केशने तिची स्थापना केली होती असे सांगितले जाते. या राजाच्या युद्धात पराभव झाला होता तेव्हा देवीने त्याच्या स्वप्नात येऊन मंदिर बांध असा दृष्टांत दिला होता. राजाने त्यानुसार मंदिर बांधले आणि गेलेले राजेपद त्याला पुन्हा मिळाले अशी कथा सांगितली जाते.

Leave a Comment