उत्तराखंडमधील रेल्वे स्थानके होणार संस्कृतमय


नवी दिल्ली – उत्तराखंडमधील रेल्वे स्थानकांवर असलेल्या स्थानकाच्या नावांच्या फलकामधील उर्दू भाषेतील नावाचा उल्लेख आता संस्कृत भाषेत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उत्तर रेल्वेने हा बदल करण्यामागचे कारण सांगताना सांगितले की, राज्याची संस्कृत ही दुसरी अधिकृत भाषा असल्याने हा बदल करण्यात आला असून तो नियमानुसारच आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सन २०१० मध्ये संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याची घोषणा केली होती. आता निशंक हे केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री आहेत.

याबाबत उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या नियमावलीत हे सांगण्यात आले आहे की, हिंदी आणि इंग्रजीनंतर संबंधित राज्याच्या दुसऱ्या अधिकृत भाषेत प्लॅटफॉर्मवरील साईन बोर्डवर रेल्वे स्थानकांची नावे लिहिली जायला हवीत. आता संपूर्ण उत्तराखंडमध्ये रेल्वे स्थानकांवरील फलकांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि उर्दूऐवजी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत स्थानकांची नावे लिहिण्यात येतील.

‘संस्कृत’ उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा असल्याने रेल्वे स्टेशन्सवर उर्दूमध्ये लिहिलेल्या नावांना बदलून संस्कृतमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती दीपक कुमार यांनी दिली. ९ नोव्हेंबर २००० मध्ये उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तरी आजपर्यंत रेल्वे स्थानकांवरील नावे उर्दूमध्येच लिहिण्यात येत होती. कारण, यातील बहुतेक स्थानकांची नावे ही उत्तराखंड उत्तर प्रदेश राज्याचा भाग होते तेव्हापासूनची आहेत. उत्तर प्रदेशची दुसरी अधिकृत भाषा उर्दू आहे.

Leave a Comment