एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या ९००० धावा पूर्ण


बंगळुरू – भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक व तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठी कामगिरी नोंदवली. एकदिवसीय क्रिकेटमधील ९ हजार धावांचा टप्पा हिटमॅन रोहित शर्माने पार केला आहे. रोहितने हा विक्रम ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच षटकात फलंदाजी करताना केला आहे.

हिटमॅनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे शिखर गाठताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. रोहितने २१७ व्या डावात नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करण्यासाठी गांगुलीला २२८ तर, सचिनला २३५ डाव खेळावे लागले होते.

त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान ७ हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा वेगवान सलामीवीर फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ४२ धावा करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. रोहितने १३७व्या डावात सलामीवीर म्हणून ७ हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करण्यासाठी अमलाने १४७ डाव खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने १६० डावात ही कामगिरी केली होती.

Leave a Comment