मशीद परिसरात पार पडला हिंदू विवाह, मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

केरळच्या अलापूझामध्ये मुस्लिम समाजाने मशीद परिसरात एका हिंदू मुलीचे लग्न लावून एकतेचा संदेश दिला आहे. अलापूझा येथील चेरुवल्लीमध्ये मशीद परिसरात पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. मशीद कमिटीने विवाह संपन्न झाल्यानंतर खास जेवणाचे देखील आयोजन केले. यावेळी हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक उपस्थित होते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील मुस्लिम समाजाच्या या कार्याचे कौतूक केले.

विवाहित तरुणी अंजूच्या वडिलांचे 2 वर्षांपुर्वी एका अपघातात निधन झाले. त्यानंतर तिची आई बिंदू मुलीच्या लग्नासाठी चिंतेत असायच्या. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने लग्नाच्या खर्चासाठी अडचण निर्माण होत होती. अशावेळी बिंदू यांनी मुलीच्या विवाहासाठी स्थानिक मशीदीकडे मदत मागितली व मशीदीने देखील मदत करणार असल्याचे पुर्ण आश्वासन दिले.

लग्नासाठी मशीद परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. आतच मांडवाची व पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हिंदू प्रथेनुसार अंजू व शरदचे लग्न लागले. लग्नानंतर पाहुण्याने मशीद परिसरात जेवण देखील केले. दोन्ही समाजाचे जवळपास 1 हजार लोक उपस्थित होते. नवविवाहित वधूला कमेटीने सोन्याचे 10 दागिने व 2 लाख रुपये देखील भेट म्हणून दिले.

केरळ मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील नवविवाहित जोडपे आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

या जोडप्याच्या लग्नाची पत्रिका देखील व्हायरल झाली होती. सोशल मीडियावर युजर्स या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

Leave a Comment