जॉन्टी ऱ्होड्सला बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटाची भूरळ


मुंबई – बॉलिवूडच्या एका चित्रपटाची दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्षेत्रक्षक आणि क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सला भूरळ पडली आहे. जॉन्टी ऱ्होड्सने रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा अभिनय असलेला ‘गली बॉय’ हा चित्रपट पाहून अंगावर शहारे आले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटातील अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि जॉन्टी ऱ्होड्सची भेट झाल्यानंतर, या चित्रपटाची गाणी जॉन्टी ऱ्होड्सने ऐकली. मी गेल्या वर्षी सिद्धांत चतुर्वेदीला एका कार्यक्रमात भेटलो तेव्हापासून मी ‘गली बॉय’ ची गाणी ऐकत आलो आहे. मी काल रात्री अमिरातीहून भारतात आलो, तेव्हा हा संपूर्ण चित्रपट पाहिला. उपशीर्षकांबद्दल धन्यवाद. हसलो, ओरडलो आणि माझे केसदेखील उभे राहिले, असे जॉन्टी ऱ्होड्सने म्हटले आहे.

झोया अख्तरने रॅपर्स नावेद शेख ( नेजी ) आणि विवियन फर्नांडिस ( डिवाईन ) यांच्या जीवनावर आधारित असेला ‘गली बॉय’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. पण या चित्रपटाची तुलना काहीजणांनी हॉलिवूडच्या ‘स्ट्रेट आउटा कॉम्पटॉन’ या चित्रपटाशी केली होती. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील एक तरुण आपल्या समस्या रॅपच्या माध्यमातून मांडतो, अशी याची कथा होती. या रॅपरची भूमिका रणवीर सिंहने साकारली होती. २०१९ च्या फेब्रुवारीत प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवरही कमाल केली होती. या चित्रपटाची भारताच्या वतीने ऑस्कर नामांकनासाठी निवड केली होती. पण ऑस्करच्या शर्यतीत ‘गली बॉय’ टिकू शकला नाही.

Leave a Comment