स्पायडरमॅन प्रमाणे भिंती चढणार रोबो


अमेरिकन संशोधकांनी एक खास उपकरण तयार केले असून तो एक रोबो आहे. हा रोबो स्पायडरमॅन प्रमाणे हातांच्या आणि पायांच्या मदतीने खडबडीत आणि कितीही उंचीच्या भिंती सहज चढू शकतो. शिवाय या रोबोच्या हातांची क्षमता वाढविणे शक्य आहे त्यामुळे गगनचुंबी इमारती स्वच्छ करणे किंवा या टोलेजंग इमारतीत आग लागल्यास अग्निशमन दल जेथे पोहोचू शकणार नाही अश्या जागी हा रोबो मददगार ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स मधील वैज्ञानिक आणि विभाग प्रमुख जिन ली या संदर्भात माहिती देताना म्हणाले, पारंपारिक सक्शन पद्धतीने खडबडीत भिंती किंवा जमिनी स्वच्छ करणे अडचणीचे असते. त्यासाठी आम्ही झिरो प्रेशर डिफरन्स पद्धत वापरली आहे, यामुळे व्हॅक्युम लिकेज होत नाही. या डिझाईनचा उपयोग अनेक प्रकारे होऊ शकणार असून प्रामुख्याने भिंती चढणे या कामासाठी या तंत्राने बनविलेले रोबो अतिशय उपयोगी ठरणार आहेत.

हे तंत्र तीन विविध आकाराच्या सक्शन मध्ये वापरता येणार आहे. एकात वस्तू पकडणे, दुसऱ्यात वस्तू सांभाळणे आणि तिसऱ्यात रोबोच्या हाताच्या सहाय्याने भिंतीवर चढणे अश्या क्रिया शक्य आहेत. गगनचुंबी इमारतींना आग लागल्यास हा रोबो सक्शन पद्धतीने त्याचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment