या शनीमंदिरात वर्षातून एक दिवस घडतो चमत्कार


फोटो सौजन्य पत्रिका
येत्या २२ जानेवारीपासून शनीदेव मकर राशीत प्रवेश करत आहेत याचा अर्थ मकर राशीला साडेसाती सुरु होत आहे. ज्या राशींना साडेसाती असते ते शनीच्या प्रकोपापासून सुटका व्हावी म्हणून शनी उपासना करतात, शनीचे दर्शन घेतात. देशभरात अनेक शनी मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची खासियत वेगळी आहे. शनी हा सूर्याचा मुलगा, यमुनेचा भाऊ आणि न्यायाची देवता म्हणून ओळखला जातो. त्याचे एक खास मंदिर उत्तराखंड राज्यात खरसाली येथे आहे. या मंदिरात वर्षातून एकदा कार्तिक पौर्णिमेला चमत्कार घडतो असे सांगतात.


समुद्रसपाटीपासून ७ हजार फुट उंचीवर असलेल्या या गावातील हे शनी मंदिर पाच मजली आहे मात्र बाहेरून ते एक मजली वाटते. हे मंदिर पांडवांनी बांधले असे सांगितले जाते. शनीदेव येथे कायम निवास करतात अशी श्रद्धा आहे. तर त्याची बहिण यमुना यमुनोत्रीचे मंदिर अक्षयतृतीयेला उघडते आणि भाऊबिजेला बंद झाले की यमुना ६ किमीवर असलेल्या खरसाली येथे माहेरी येते आणि सहा महिने येथे राहते असा समज आहे. शनी मंदिराचे बांधकाम दगड आणि लाकडात केलेले आहे. शनिदेवाची मूर्ती काश्याच्या धातूपासून बनविली गेली आहे.

या मंदिरात अखंड ज्योत आहे. या ज्योतीच्या नुसत्या दर्शनाने जीवनातील सर्व पीडा दूर होतात असे मानले जाते. तर शनीच्या दर्शनाने शनी दोषातून मुक्ती मिळते असा समज आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला या मंदिराचे घडे आपोआप बदलतात. या दिवशी जो भाविक शनीचे दर्शन येथे येऊन घेईल त्याची सर्व अडचणीतून मुक्तता होते.

Leave a Comment