अजय देवगनच्या ‘मैदान’मध्ये झळकणार हा दाक्षिणात्य चेहरा


सध्या आपल्या ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटामुळे अभिनेता अजय देवगन चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार करत दमदार यश मिळवले आहे. अजय या चित्रपटानंतर ‘मैदान’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुरुवातीला किर्ती सुरेश ही अभिनेत्री या चित्रपटात भूमिका साकारणार होती. पण या चित्रपटातून तिने माघार घेतली आहे.


आता अजय देवगनसोबत ‘मैदान’ चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रिया मनी ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही माहिती अजय देवगनने ट्विट करून दिली आहे. आत्तापर्यंत ५० चित्रपटांमध्ये प्रिया मनीने भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातही शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसोबत भूमिका साकारली होती. प्रिया मनीची ‘फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमधील भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

‘मैदान’ हा चित्रपट फुटबॉल खेळाडूवर आधारित असून यामध्ये अजय देवगन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ, बोनी कपूर, आकाश चावला आणि अरूणा जॉय सेनगुप्ता करत आहेत. २७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment