अरेच्चा ! सेकेंड हँड सुटकेसमध्ये व्यक्तीला सापडले 30 लाख रुपये

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी हरवलेले एखादे सामान पुन्हा मिळतेच असे नाही. एखाद्या इमानदार व्यक्तीला ती वस्तू सापडली तरच पुन्हा मिळण्याची शक्यता असते. असेच काहीसे उदाहरण अमेरिकेच्या सेंट्रल मिशिगन येथे राहणाऱ्या 50 वर्षीय हॉबर्ड किर्बी यांनी सादर केले आहे.

काही दिवसांपुर्वी त्यांनी सेकेंड हँड शॉपिंग सेंटरमधून एक जुनी सुटकेस खरेदी केली होती. जेव्हा त्यांच्या मुलीने ही सुटकेस उघडून बघितली, तेव्हा तिला धक्काच बसला. त्या सुटकेसमध्ये तब्बल 30 लाख 54 हजार रुपये रोख रक्कम होती.

आधी तर त्यांना समजलेच नाही की या पैशांचे काय करायचे. हॉबर्ड यांनी विचार केला की, या पैशांनी ते घराचे कर्ज फेडू शकतात व निवृत्तीनंतर आनंदात आयुष्य घालवू शकतील. त्यांनी आपल्या वकिलाचा देखील सल्ला घेतला. त्यावर वकिलाने सांगितले की, हे पैसे स्वतःकडेच ठेवावे कारण यासाठी कोणीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही.

मात्र हॉबर्ट यांनी हे पैसे खऱ्या मालकापर्यंत पोहचवण्याचा विचार केला. त्यानंतर हॉबर्ट यांनी पैशांनी भरलेली सुटकेस पुन्हा शॉपिंग सेंटरच्या मॅनेजरला परत केली.

जेव्हा सुटकेसच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यात आला, तेव्हा समजले की, ते न्यूबेरी येथील एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाने वडिलांच्या निधनानंतर सुटकेस न तपासता अन्य सामानाबरोबर शॉपिंग सेंटरला दान केले होते. शॉपिंग सेंटरच्या मालकाने देखील हॉबर्ट यांच्या प्रामाणिकपणाचे कौतूक केले.

Leave a Comment