बिहारमधील ४ कोटी २७ लाख नागरिकांनी साकारली जगातील सर्वात मोठी मानवी साखळी


पटना – आज बिहारमध्ये जगातील सर्वात मोठी मानवी साखळी तयार करण्याचा विश्वविक्रम रचला जाणार आहे. ही मानवी साखळी मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन हरियाली अभियाना’च्या जनजागृतीसाठी तयार केली जाणार आहे. या मानवी साखळीचा राज्यातील तब्बल चार कोटी पेक्षाजास्त नागरिक भाग बनणार आहेत. मुख्यमंत्री नितिश कुमार या कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी शहरातील गांधी मैदानात पोहचले असून तेथून साखळीची सुरवात केली जाणार आहे.

बालविवाह, हुंडा बंदी, दारुबंदीसारखी उद्दिष्ये डोळ्यासमोर ठेवून बिहार सरकारने जल जीवन हरियाली या अभियानाची सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी त्यासाठी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यामध्ये एकूण १६ हजार ३५१ किमी लांबीची मानवी साखळी बनवण्यात येणार आहे. ५ हजार ५२ किमीची साखळी महामार्गावर असेल तर ११ हजार २९९ की.मीची लांबीची साखळी उप महामार्गांची असेल.

या साखळीला पटनामधील गांधी मैदानापासून सुरवात होणार आहे. तेथून संपूर्ण राज्यभर नागरिक या साखळीला जोडले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री आणि नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या चित्रिकरणासाठी १२ हेलिकॉप्टर आणि ३ विमानांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच दुचाकींवरुनही चित्रिकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या संघटनेच्या सदस्यांनाही बोलावण्यात आले आहे.

Leave a Comment