काळ्या गायीचेच दूध का प्यावे ?


हाडे मजबूत करण्यासाठी जुन्या काळचे वैद्य काळ्या रंगाच्या गायीचे दूध पिण्याची शिफारस करीत असत. खरे तर गायीचे दूध हे सरसकट सारखेच असणार. मग लाल, पांढ़र्‍या किंवा अन्य कोणत्याही रंगाच्या गायीचे दूध सोडून काळ्याच गायीचे दूध पिण्याचा सल्ला का देत असावेत असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. विशेष म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार काळ्या कपिलेचे दूध त्यायला सुरूवात केल्यावर गुणही येत असे. काळ्या गायीचे दूध पिण्याचा सल्ला देणार्‍या वैद्यालाही यामागचे कारण समजत नव्हते. ते आपले रुढीनुसार आणि आयुर्वेदात सांगितले आहे म्हणून मागील पानावरून पुढे या क्रमाने हा सल्ला देत होते.

अलीकडे मात्र त्याचे कारण नीट समजले आहे. हाडे मजबूत होण्यासाठी शरीराला ड जीवनसत्त्वाची गरज असते. हे जीवनसत्त्व दाळीतून मिळते. शिवाय मांसाहारातूनही मिळते. पण सगळेच लोक काही मांसाहार करीत नाहीत. आपल्या देशात तर शाकाहारीच लोक जास्त आहेत. शिवाय दाळीतून मिळणारे ड जीवनसत्त्व तुलनेने कमी प्रमाणात मिळते. म्हणून दूध हाच या जीवनसत्त्वाचा स्रोत म्हणून वापरला जात होता. या दुधाचे इतरही अनेक फायदे आहेतच. शिवाय दुधातून प्राप्त होणारे ड जीवनसत्त्व हे थेट मिळते. पण प्रश्‍न असा आहे की, असे आहे तर काळ्याच गायीचे दूध का प्यावे ? ड जीवनसत्त्चाचा सर्वात मोठा स्रोत आहे सूर्यप्रकाश. दाळी आणि मांंसाला पैसे लागतात. पण सूर्यप्रकाशाला काही पैसे पडत नाहीत. काळा रंग हा सूर्याचे किरण जास्त शोषून घेतो. म्हणजेच काळ्या गायीच्या दुधात ड जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते.

आयुर्वेदाचे संशोधन करणार्‍या ऋषीमुनींच्या तर्कशास्त्राला सलामीच केली पाहिजेे. मात्र ज्या काळात हा सल्ला दिला गेला त्या काळात म्हशीचे दूध पिण्याची पद्धत पडली नसावी. म्हणून काळी गाय पसंत केली गेली पण आता म्हशीचे दूध सरसकट वापरले जाते. म्हशी तर सगळ्याच काळ्या असतात. तेव्हा त्या सर्व म्हशींच्या दुधात ड जीवनसत्त्व जास्तच असणार. म्हणून हाडांच्या मजबुतीसाठी म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला द्यायला काही हरकत नसावी. ड जीवनसत्त्व हेही काही हाडांना मजबूत करण्याचे काम थेटपणे करीत नाही. मुळात हाडांची मजबुती ही कॅल्शीयम वर अवलंबून असते. ड जीवनसत्त्व हे खाल्लेल्या अन्नातले कॅल्शीयम शोषून घेण्याचे काम करीत असते. ते कॅल्शीयम हाडांना मजबूत करीत असते. एकंदरीत उन्हात जास्त फिरण्यानेही शरीराला ड जीवनसत्त्व मिळू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment