मेगाभरती ही चूकच… चंद्रकांत पाटीलांचे धक्कादायक वक्तव्य


पुणे : पिंपरी-चिंचवडमधील भाजप मेळाव्यात मेगाभरती ही चूकच, असल्याचे धक्कादायक वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी या वक्तव्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवरच बोट ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपची मेगाभरती ही सर्वात मोठी चूक असल्यामुळे भाजपच्या मुळ संस्कृतीला धक्का बसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्यात म्हटले.

भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार पाडून या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. या बाहेरील नेत्यांचे स्वागत करताना यावेळी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये उत्साह होता. याचे कारण म्हणजे आता विरोधी पक्ष संपणारच असे चित्र त्यावेळी निर्माण झाले होते आणि दुसरे म्हणजे आता काँग्रेस, राष्ट्रवादीतील हे दिग्गज नेते आल्याने पक्ष जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास या नेत्यांना होता. पण या मेगाभरतीमुळे त्याचवेळी पक्षातील काही जण नाराज होते. या मेगाभरतीमुळे ज्यांची संधी हिरावली गेली किंवा ज्यांना ही मेगाभरती पटत नव्हती ते नेते नाराजी व्यक्त करत होते. पण उघडपणे कुणीही बोलायला तयार नव्हते.

आता ही नाराजी भाजपा सत्तेपासून दूर राहिल्यामुळे समोर येत असल्याचे म्हणावे लागेल. तेव्हा मेगाभरतीचे सर्व निर्णय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते. पण आता मेगाभरती चूकच असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या तेव्हाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह लावल्याचे बोलले जात आहे.

चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याने मेगाभरतीद्वारे भाजपमध्ये आलेले निश्चितच नाराज होणार आहेत. पण त्यांची नाराजी वाढून पक्षाची डोकेदुखी आणखी वाढू नये याची काळजी पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रकांत पाटील काय बोलले याची माहिती नसल्याचे प्रतिपादन केले आहे. पण राजकीय पक्ष वाढीसाठी मेगाभरती आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. पण ती करताना जुन्यांचा अपमान आणि नव्यांचा सन्मान होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपच्या देशभक्ती धोरणाला-समाजहित नीतीला धरून नवी भरती असली तर पक्षाला बळकटी मिळते, पक्ष खाजगी मालमत्ता होऊ नये, असे ही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

भाजप विरोधकांच्या हाती चंद्रकात पाटील यांच्या कबुलीमुळे आयतेच कोलीत मिळाल्यामुळे विरोधकांनी आता भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. चूक लक्षात आली आहे तर मेगाभरती केलेल्या सगळ्यांची हकालपट्टी करा असा थेट टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. कारण मेगाभरतीत सगळ्यात जास्त राष्ट्रवादी पक्ष फुटला होता.

Leave a Comment