थोडासाच बदल हवा आहे


आजकाल सर्वांनाच हृदयविकाराची दहशत बसली आहे. कोणाला कधी ऍटॅक येईल याचा काही नेम नाही. म्हणून प्रत्येकजण आपल्यावर ते संकट येऊ नये यासाठी काय काय काळजी घेता येईल याचा विचार करायला लागला आहे. काही तज्ज्ञांनी याबाबतीत काही सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. फार सोप्या पाच गोष्टी आहेत. त्या सांभाळल्या की हृदयविकाराची भीती बरीच कमी होईल. पहिली गोष्ट म्हणजे मीठ कमी खा. कारण मीठ जादा खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. तोच पुढे माणसाला हृदयविकाराकडे घेऊन जात असतो. या बाबत तज्ज्ञांचा सल्ला असा असतो की, दररोज पाच ग्रॅमच मीठ सेवन केले पाहिजे. जेवताना कोणत्याही पदार्थात वरून पुन्हा जादा मीठ घालणे टाळले पाहिजे. शिवाय लोणचे, पापड, बाजारातले तयार पदार्थ, फरसाण यांना दूर ठेवले पाहिजे.

हृदयविकार टाळण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे धूम्रपान टाळणे. आधीच हृदयविकाराची जोखीम असलेल्यांचा तो धोका धूम्रपानाने दुप्पट होतो. व्यसने टाळण्यासाठी संगत बदलली पाहिजे. शेवटी एखादा माणूस मित्रांच्या संगतीमुळेच व्यसनांच्या नादी लागत असतो. संगत बदलणे आणि योग, ध्यान करणे हेही व्यसने सुटण्यासाठी उपयोगी येते. अनेक लोक जाडी वाढत चालली तरीही तिच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांना का कळत नाही की ही वाढत चाललेली जाडीच आपल्याला अनेक विकारांकडे नेत असते. जाडी वाढायला काही वेळ लागत नाही पण ती कमी करायला फार वेळ आणि सायास करावे लागतात. तेव्हा जाडी आणि वजन यावर बारकाईने लक्ष ठेवा. वजन थोडेही वाढले तरी सावध व्हा.

आपल्या आयुष्यातला हा मोठा धोका टाळण्यासाठी दररोज ३० मिनिटे व्यायामाला द्या. ३० मिनिटे हा काही फार मोठा वेळ नाही पण बहुतेक लोक तेवढा वेळ देत नाहीत. व्यायामही नेमका कोणता करावा असा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो पण तज्ज्ञांचे मत असे की, चालणे हा सर्वात चांगला व्यायाम होय. त्याला काही साधने लागत नाहीत आणि तो व्यायाम करण्यासंबंधी काही कडक नियमही नसतात. आहारात पोटॅशियम जास्त असलेले अन्न असावे हेही एक पथ्य पाळले पाहिजे. या सगळ्या व्यापारात मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे असते.त्यासाठी चार लोकांत मिसळणे, कसला तरी छंद लावून घेणे असे उपाय सुचविले जातात कारण शेवटी माणसाला कशात तरी मन गुंतवणे आवश्यक असते. त्याचा हृदयावर परिणाम होत असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment