जंगलाजवऴ राहिल्याने मेंदू होतो तल्लख


फार पुरातन काळात आपल्या देशातल्या ऋषीमुनींनी अनेक शोध लावले आहेत. कसल्याही दुर्बिणीचा वापर न करता केवळ उन्हाचे निरीक्षण करून त्यांनी आपल्या पासून लाखो मैल दूर असलेल्या ग्रहांच्या भ्रमणकक्षा आणि उदयास्ताची वेळ यांचे अचूक निदान केले होते. त्यांची बुद्धीमत्ता चांगली होती म्हणूनच त्यांना हे शक्य झाले यात काही शंका नाही पण त्यांची बुद्धीमत्ता तीव्र असण्याचे कारण काय याचा आता अंदाज यायला लागला आहे. ते ऋषी अरण्यात रहात असत. अरण्यात वास्तव्य असल्यामुळे त्यांचे मेंदू तल्लख होते असे आता यूरोपात करण्यात आलेल्या काही संशोधनांच्या निष्कर्षावरून वाटायला लागले आहे. हे संशोधन जर्मनीत झाले आहे.

माणूस जंगलांच्या जेवढा जवळ राहतो तेवढा अधिक शहाणा असतो असे जर्मनीत करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आले आहे. यूरोपातले संंशोधक काही लोकांची बुद्धीमत्ता आणि जंगलाच्या जवळचे त्यांचे वास्तव्य यांचा असा मेळ घालून केवळ थांबत नाहीत तर जंगलाच्या जवळ राहण्याने माणसाच्या मेंदूच्या क्रिया कलापात का बदल होतो याचा सविस्तर अभ्यास करून ते या दोन गोष्टींची संगत लावतात. आपल्यालाही असा अनुभव येत असतो. खेड्यात राहणारी मुले शहरातल्या मुलांपेक्षा अधिक तल्लख असतात असा अनुभव आपल्याला नेहमीच येत असतो. आता तर अशा प्रकारच्या पाहण्या विस्ताराने करण्यात आल्या आहेत आणि खेड्यातली मुले निसर्गाच्या अधिक जवळ असल्याने तेज असतात असे आढळले आहे. शहरातली लोकवस्ती दाट असते आणि खेड्यातली वस्ती विरळ असते याही गोष्टीचा परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असतो असे भारतातही दिसून आले आहे.

या सगळ्या गोष्टींचा माणसाच्या मानसिक आरोग्याशी संबंध असतो. शहरातला गोंगाट, वाहनांची वर्दळ आणि हवेच्या प्रदूषणामुळे माणसाला चिडचिड होते. मनाचा विकास होत नाही. मनाच्या विकासाला शांतता असावी लागते. तशी ती शहरापेक्षा खेड्यात जास्त असते. म्हणून खेड्यातले लोक कधीही शांत असतात आणि शहरातले लोक सतत उद्विग्न असतात. अशा मानसिक अवस्थेत मनाचा विकास आणि मनाची शांती शक्यच नसते. खेड्यातल्या मुलांचे आरोग्य तुलनेने चांगले असते. शहरातल्या लोकांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे मनोकायिक विकार जास्त प्रमाणात होतात. ते खेड्यात फार कमी प्रमाणात असतात. कारण निसर्गाचे सान्निध्य.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment