जगातील काही अविश्वसनीय घटना


जगामध्ये काही घटना अश्या घडतात, की त्या का घडल्या असाव्यात यामागे कधीच कोणते कारण देता येत नाही. त्या घटना घडूनही जातात, आणि आपल्याला अचंबित करून जातात. अशाच काही विचित्र, अविश्वसनीय घटना..

१९९३ साली कोलरॅडोमध्ये राहणारा विलियम जेराकी नावाचा मच्छिमार समुद्रावर मासेमारी करून परतत असताना त्याचा पाय अचानक एका मोठ्या धोंड्याखाली सापडला. विलियम ने आपला पाय सोडविण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केल्या त्याचा पाय धोंड्याखालून निघेना. शेवटी आपली सुटका करून घेण्याकरिता विलियम ने त्याच्या जवळ असलेल्या सुऱ्याने चक्क आपला पायच कापून टाकला. त्या भीषण अवस्थेत, भयंकर रक्तस्राव होत असतानाही विलियम जवळ जवळ अर्धा मैल रांगत आपल्या गाडीजवळ पोहोचला. इतकेच नाही, तर त्यापुढे अजून अर्धा मैल स्वतः गाडी चालवत हॉस्पिटल मध्ये पोहोचला. त्याला पाहून आणि त्याची अवस्था बघून तिथल्या लोकांना काय वाटले असेल, याची कल्पना आपण करू शकतो.

जपान मधील फुकुओका या गावामध्ये राहणाऱ्या एका मनुष्याने एक घर विकत घेतले आणि त्या घरामध्ये तो आपल्या परिवारासोबत राहू लागला. पण लवकरच त्याच्या लक्षात आले की त्या घरामध्ये अजब चोरीच्या घटना घडत होत्या. आश्चर्याची गोष्ट अशी, की चोरी केवळ फ्रीजमधील खाद्यपदार्थांचीच होत असे. घरातील बाकी कोणत्याही वस्तू चोरीला जात नसत. हा मनुष्य रोज संध्याकाळी कामावरून येताना फळे, भाज्या, इतर खाद्यपदार्थ घेऊन येत असे. घरी आल्यावर हे खाद्यपदार्थ तो आपल्या फ्रीजमध्ये भरून ठेवत असे. आणि आश्चर्याची गोष्ट ही, की दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व खाद्यपदार्थ फ्रीज मधून गायब झालेले असत. ह्या प्रकाराने घरतील सर्वच जण बुचकळ्यात पडले. शेवटी त्यांनी आपल्या स्वयंपाकघरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावायचे ठरविले. त्या कॅमेरामध्ये कैद झालेली दृश्ये घरातील मंडळींनी पाहिली आणि सर्व गोष्टींचा खुलासा झाला. त्या मनुष्याच्या स्वयंपाकघरामध्ये सहज नजरेला न पडणारा एक चोरदरवाजा होता, व त्या दरवाज्याच्या पाठीमागे एक गुप्त खोली देखील होती. त्या खोलीमध्ये एक बेघर स्त्री चक्क रहात होती. दररोज रात्री चोर दरवाज्यातून आत येऊन ती स्त्री फ्रीज मधील अन्न काढून घेत असे. हे स्त्री त्या घरामधील गुप्त खोलीमध्ये तब्बल चार महिने रहात असून, घरातील लोकांना त्याचा पत्ताच नव्हता. हा प्रकार उघड झाल्यावर घरातील लोकांनी अर्थातच पोलिसात तक्रार केली, व त्या बेघर स्त्रीला अटक झाली.

२००१ साली इंग्लंड मध्ये राहणाऱ्या लॉरा बक्सटन नावाच्या दहा वर्षीय मुलीने आपल्या आजी आजोबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आकाशामध्ये एक भला मोठा हेलियम भरलेला फुगा सोडून दिला. हा फुगा ज्याला मिळेल, त्याने तो लॉरा बक्सटन हिला परत करावा असा संदेश असलेली चिठ्ठी लॉरा ने या फुग्यामध्ये ठेवलेली होती. त्या चिठ्ठीमध्ये तिने आपले संपूर्ण नाव आणि पत्ता देखील लिहिलेला होता. सुमारे १४० मैलांवर रहात असणाऱ्या अँडी रिव्हर्स यांच्या शेतामध्ये हा फुगा उडतउडत पोहोचला. अँडी ने फुगा फोडून आतील चिठ्ठी वाचली आणि त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. कारण त्याच्या ओळखीची असणारी आणखी एका दहा वर्षांची मुलगी होती आणि तिचेही नाव लॉरा बक्सटनच होते. अँडीच्या आग्रहाखातर या लॉरा ने दुसऱ्या लॉरा ला पत्र लिहिले आणि तिला भेटण्याची विनंती केली. जेव्हा या दोन्ही लॉरांची भेट झाली तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले, कारण ह्या दोन्ही लॉरा एकसारख्या दिसत होत्या, त्यांचे वय, उंची आणि अगदी डोळ्यांचा रंग देखील तंतोतंत जुळत होता. इतकेच नाही तर, तर दोन्ही लॉरांकडे राखाडी रंगाचे ससे, गिनी पिग्स आणि तीन वर्षांचे लॅब्रेडोर कुत्रे होते.

Leave a Comment