सरपंचपदाची निवडणूक लढवणार ९७ वर्षांच्या आजीबाई !


रायपूर – सध्या सोशल मीडियात राजस्थानमधील सीकर जिल्ह्याच्या नीमकाथाना गावामधील एक आजीबाई चांगल्याच चर्चेत आहेत, पण त्यांच्याबाबत होणाऱ्या चर्चेला कारण देखील तसेच आहे. गावात होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी विद्या देवी या ९७ वर्षांच्या आजी बाईंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावातील वृद्ध महिलांसोबत बसून गावच्या विकासाचे मॉडेल, स्वच्छता, स्वच्छ पाणी, विधवा पेन्शन अशा अनेक मुद्द्यांवर या आजी चर्चा करतात.

भल्याभल्यांना लाजवेल असा या आजींचा राजकीय अनुभव आहे. त्यांचे सासरे सुभेदार सेडूराम हे २० वर्ष सरपंच होते. तसेच ५५ वर्षांपूर्वी त्यांचे पती हुतात्मा मेजर शिवराम सिंह यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. शिवाय, त्यांचा नातूदेखील वॉर्ड २५ मधून नगरसेवक आहे. त्यांनी लग्न झाल्यापासूनच राजकारण अगदी जवळून पाहिले असल्यामुळेच यावर्षी या वयातही प्रचंड आत्मविश्वासाने त्या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.

आतापर्यंत पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या विद्या देवींनी सांगितले, की त्या सरपंच किंवा गावप्रमुख निवडण्याची प्रक्रिया स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहत आल्या आहेत. हात वर करून मतदान करत गावप्रमुख निवडणे, कागदावर शिक्का मारून मतदान करणे, तसेच आता आलेल्या अत्याधुनिक अशा ईव्हीएम मशीनवरदेखील त्यांनी मतदान केले आहे. आपल्या गावानेही या बदलत्या काळात बदलले पाहिजे, असा विचार घेऊन या निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या आहेत.

Leave a Comment