समुद्री मीठ प्रोसेस्ड मीठापेक्षा जास्त चांगले आहे का?


अलीकडच्या काळामध्ये जेवणामध्ये समुद्री मीठाचा वापर करण्यास पसंती मिळत आहे. नेहमी वापरल्या जाणऱ्या प्रोसेस्ड मीठाच्या मानाने समुद्री मीठ थोडे जाडसर, कुरकुरीत आणि चवीला जास्त खारट असते. समुद्री मीठाच्या सेवनाने आरोग्यास मिळणारे फायदे लक्षात घेता, आता समुद्री मीठाचा वापर जास्त होताना पाहायला मिळत आहे. पण म्हणून समुद्री मीठ हे आपल्या नेहमीच्या प्रोसेस्ड मीठापेक्षा वेगळे असल्याने श्रेष्ठ आहे किंवा नाही हा विचार करणे अगत्याचे आहे.

समुद्री मीठ हे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन ( evaporation ) करून तयार केले जाते. त्यामुळे या मीठामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम मॅग्नेशियम इत्यादी क्षारांचे अंश असतात. या उलट आपल्या वापरातील नेहमीचे मीठ अनेक प्रक्रियांद्वारे बनविलेले असल्याने त्यामधील क्षार नष्ट होतात. त्याशिवाय हे मीठ ‘फ्री-फ्लोइंग’ राहावे, त्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत या करिता यामध्ये अनेक ‘अॅडीटीव्हज्’ चा वापर केला जातो. पण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे प्रोसेस्ड मीठामध्ये क्षारांचे अंश नसल्याने फारसे नुकसान होण्याचे कारण नसते, कारण हे क्षार आपल्याला फळे आणि भाज्यांच्या द्वारेही मिळविता येतात.

समुद्री मीठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी आहे असा सर्वसाधारणपणे लोकांचा समज असतो. पण अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हा समज चुकीचा आहे. समुद्री मीठामध्ये आणि नेहमीच्या वापरातील प्रोसेस्ड मीठामध्ये सोडियमचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. तसेच समुद्री मीठामध्ये आयोडीनचे प्रमाण प्रोसेस्ड मीठामध्ये असणाऱ्या आयोडीनच्या प्रमाणापेक्षा कमी असते. याचे कारण असे, की प्रोसेस्ड मीठावर प्रक्रिया केल्या जात असताना त्यामध्ये आयोडीन घातले जाते. आयोडीनमुळे शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत सुरू रहाते. थायरॉईड ग्रंथी हृदय, नर्व्हस सिस्टम आणि शरीरातील चयापचयाला नियंत्रित करते.

आता प्रश्न उरतो तो हा, की समुद्री मीठ वापरावे की प्रोसेस्ड मीठ वापरावे? विचार करण्यासारखी गोष्ट ही, की आपल्या शरीराला दररोज २३०० मिलीग्राम पेक्षा कमी सोडियमची आवश्यकता असते. त्यामुळे समुद्री किंवा प्रोसेस्ड यांच्यापैकी कुठलेही मीठ वापरले, तरी त्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवायला हवे. प्रमाणाबाहेर खाल्ले जाणारे मीठ निरनिराळ्या व्याधींना आमंत्रण ठरू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment