निस्तेज त्वचा सतेज कशी बनवाल?


तुम्ही मासिकावरील किंवा टीव्हीवरील एखाद्या जाहिरातीतील मॉडेलचा चेहरा नेहमीच पहात असाल आणि तिचा चेहरा इतका सतेज कसा दिसत असेल असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. आपले आवडते चित्रपटातील कलाकारांचे चेहरे मेकअप शिवाय देखील इतके टवटवीत कसे दिसू शकतात, ह्याचे ही आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. पण यांच्यासारखी सतेज त्वचा तुम्ही ही मिळवू शकता. या साठी कोणतीही कोस्मेटिक सर्जरी किंवा महागड्या पार्लर मधील ट्रीटमेंट ची गरज नाही. काही सोप्या उपायांचा अवलंब केल्याने आपल्या त्वचेचा निस्तेजपणा जाऊन त्वच पुन्हा सतेज, नितळ दिसू शकते.

त्वचा कोरडी पडायला लागली की निस्तेजही दिसू लागते. आपल्या त्वचेतील पेशींना जर आतून आर्द्रता मिळाली नाही, तर त्वचेच्या वरून कितीही क्रीम्स किंवा लोशन्स लावली तरी त्या क्रीम्स् मधील आर्द्रता देणारी तत्वे त्वचेला आवश्यक ती आर्द्रता देऊ शकत नाहीत. त्वचेला आर्द्रता देण्याकरिता भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. सुरुवातीला जास्त पाणी पिण्याची सवय करून घेणे थोडेसे जड जाते, पण काही काळामध्ये ही सवय अंगवळणी पडून जाते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढविले असता, यामुळे त्वचेवर पडत असलेला फरक लवकरच आपल्याला जाणवू लागेल.

चांगल्या प्रतीच्या तेलाने त्वचेला मसाज केल्याने ही त्वचा अधिक नितळ व सतेज दिसू लागते. अॅवोकाडो, बदाम किंवा ऑलिव्ह तेले मसाज साठी वापरणे चांगले. या तेलांपैकी कोणतेही तेल वापरून केलेल्या मसाज मुळे त्वचेचे रक्ताभिसरण वाढते व त्यामुळे त्वचा अधिक सतेज व उजळ दिसू लागते. तेलाने चेहऱ्याला मसाज करावयाचा असल्यास रात्री झोपण्यापूर्वी करणे उत्तम. झोपण्याआधी चेहरा पाण्याने आणि एखदा चांगल्या प्रतीचा फेस वॉश वापरून धुवावा, आणि मग चेहरा पूर्ण कोरडा करून त्यावर तेलाने मसाज करावा. हे तेल रात्रभर चेहऱ्यावर राहू द्यावे. त्यामुळे तेलामधील सर्व पोषक घटक त्वचेमध्ये सामावतील.

दही आणि मध हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी गुणकारी आहेत. ह्या दोन्ही पदार्थांचे मिश्रण चेहऱ्यासाठीच नाही. तर संपूर्ण शरीरावरील त्वचेसाठी अतिशय फायद्याचे ठरते. दही आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला आर्द्रता मिळून त्वचेवरील उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे आलेला काळसरपणा दूर होण्यास मदत मिळते. तसेच आपल्या चेहऱ्यावर काही ठराविक काळानंतर मृत पेशींचा थर निर्माण होत असतो. ह्या थरामुळे आपली त्वचा रुक्ष, निस्तेज दिसू लागते. त्वचेवरील मृत पेशींचा थर काढून टाकण्यासाठी स्क्रबची गरज असते. बाजारामध्ये अनेक उत्तम प्रतीचे फेशियल स्क्रब उपलब्ध आहेत. जर बाजारचे स्क्रब वापरायचे नसतील तर असे स्क्रब बेसन, हळद, साय, मध, दही इत्यादी पदार्थ वापरून घरच्याघरी देखील तयार करता येतात. हे स्क्रब आठवड्यातून एकदा वापरावेत.

गुलाब जल आपल्या त्वचेसाठी अतिशय उत्तम टोनर म्हणून काम करते. त्वचेवर स्क्रब वापरल्याने किंवा एखाद्या फेस वॉशने चेहरा धुतल्यावर त्वचेवरील रंध्रे ( pores ) मोकळी होतात. या रंध्रांमध्ये साठलेली घाण चेहरा धुतल्याने बाहेर पडते. चेहरा धुतल्यानंतर खुली झालेली रंध्रे परत बंद करण्याकरिता टोनरचा वापर केला जातो. जर टोनरचा वापर केला नाही तर त्वचेवरील रंध्रे मोकळीच राहून बाहेरील घाणीचे कण रंध्रांवाटे त्वचेमध्ये शिरकाव करू शकतात, आणि मुरुमे, पुटकुळ्यांचा त्रास सुरु होतो. त्यामुळे टोनर वापरणे आवश्यक असते. गुलाबजला प्रमाणेच अॅपल सायडर व्हिनेगरही उत्तम टोनर आहे. टोनर वापरल्याने त्वचा नितळ दिसू लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment