आता ऑनलाइन भाजीपाला विकणार फ्लिपकार्ट


मुंबई: ऑनलाइन भाजी आणि ताजी फळे विकण्याचा निर्णय भारतातील ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने घेतला आहे. या पायलट प्रोजेक्टला हैदराबाद येथून सुरुवात होणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लवकरच ऑनलाइनद्वारे घरोघरी भाजी आणि फळे विक्री केली जाणार आहे.

या संदर्भातील वृत्त ‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार फ्लिपकार्ट कंपनी भाजीपाल्याची डिलिव्हरी करण्यासाठी त्यांच्या मार्केट प्लेसवर वेंडर्सशी भागीदारी करणार आहे. फ्लिपकार्टने त्यासाठी लायसन्स मिळवण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. वेकूल फूड अँड प्रॉडक्ट्ससोबतही कंपनीने भागिदारी केली आहे. फ्लिपकार्ट्सने आतापर्यंत ऑनलाइन भाजी विक्री ताजी फळे आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्याची चेन आणि रेग्युलेटरी कंप्लायन्समधील गुंतागुंतीमुळे सुरू केली नव्हती.

काही ठराविक ठिकाणीच अॅमेझॉनकडून फळे आणि भाजीपाल्याची डिलिव्हरी केली जाते. फ्लिपकार्टने ऑनलाइन भाजी विक्री करण्याचा निर्णय ही स्पेस भरून काढण्यासाठीच घेतला आहे. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे किराणा सामान असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. हा पायलट प्रोजेक्ट सध्या हैदराबादमध्ये सुरू करण्यात येत आहे. या पायलट प्रोजेक्टद्वारे ग्राहकांचा स्वभाव आणि सप्लाय चेन याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन फूड डिलिव्हरीनंतर भारतात ऑनलाइन भाजीपाला आणि फळे विकण्यावर कंपन्यांनी भर द्यायला सुरुवात केली आहे. काळाची गरज ओळखून फ्लिपकार्टनेही पावले उचलली असून फ्लिपकार्टला ऑनलाइन भाजी विक्री करताना ‘बिग बास्केट’शी टक्कर द्यावी लागणार आहे.

Leave a Comment