थ्री नॉट थ्री बोर रायफल्स होणार निवृत्त


फोटो सौजन्य झी न्यूज
येत्या २६ जानेवारीच्या परेड मध्ये गेली ६० वर्षे पोलिसांना साथ देणाऱ्या थ्री नॉट थ्री बोर रायफल्सना निवृत्ती दिली जाणार असून या परेड मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातात त्या शेवटच्या दिसतील. अर्थात सर्व्हिस मधून या रायफल्स यापूर्वीच वापरातून बाहेर गेल्या आहेत आणि त्यांची जागा अत्याधुनिक हत्यारांनी घेतली आहे. मात्र तरीही आजही त्या वापरल्या जात आहेत. आता त्यांना अधिकृत निवृत्ती दिली जात आहे.

१९४५ सालापासून पोलीस दलात या रायफल्स वापरात आहेत. उत्तरप्रदेशचे डीजीपी ओ.पी.सिंग या संदर्भात बोलताना म्हणाले, डाकू, दरोडेखोरांच्या टोळ्या आणि खतरनाक गुन्हेगार यांच्याशी सामना करताना या थ्री नॉट थ्री रायफल्सनी पोलिसांना दीर्घकाळ साथ दिली आहे. सिनेमातही या रायफल्स अनेकदा चमकल्या, अगदी शोले पासून अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांचे दर्शन घडले. पण आता मात्र या रायफल्स वापरातून बाहेर काढल्या जाणार आहेत. २६ जानेवारीच्या परेड मध्ये त्यांची वैशिष्टे ठळकपणे सांगितली जातील आणि त्यांना निरोप दिला जाईल.

उत्तर प्रदेश पोलिसांकडे अश्या ५८ हजाराहून अधिक रायफल्स आहेत. १९९५ पासून त्याचा वापर बंद झाला असला तरी अजूनही १६७०० रायफल्स वापरात आहेत. पहिल्या महायुद्धात त्यांचा प्रथम वापर झाला होता आणि इंग्रजानीही त्यांचा वापर केला होता.

Leave a Comment