होन्डुरास येथे नेहमीच पडतो माशांचा पाउस


फोटो सौजन्य कॅच न्यूज
पाऊस पडताना गारा पडणे कुणाला नवलाचे वाटणार नाही. आम्लयुक्त पाउस हाही नवा प्रकार नाही. मात्र काहीवेळा पावसातून बारीक बेडूक आणि मासे पडतात हा मात्र नेहमी घडणारा प्रकार नाही आणि त्यामुळे त्याचे नवल अनेकांना वाटते. मेक्सिको जवळ असलेल्या होन्डुरास देशाला मात्र माशांचा पाउस हे नवल नाही कारण गेली १०० वर्षे येथे नित्यनेमाने माशांचा पाउस पडतो आहे. तो कधी वर्षातून एकदा तर कधी दोनवेळा पडतो आणि साधारण वसंत ऋतूच्या सुरवातीला म्हणजे उन्हाळ्याची सुरवात होण्याच्या वेळी पडतो. यामागे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नही.

अटलांटिक महासागरापासून हा देश २०० किमी अंतरावर आहे.वैद्यानिकांच्या मते हेच या देशात माशांचा पाउस पडण्याचे कारण आहे. हवा वेगाने गरम होऊन वर जाऊ लागली तर त्याबरोबर अनेकदा छोटे मासे वर उचलले जातात आणि जेथे या हवेपासून बनलेले ढग बरसतात तेथे असा पाउस पडू शकतो.

होन्डुरासवासी मात्र ही देवाजीची करुणा किंवा कृपा असल्याचे मानतात. या संदर्भात अशी कथा सांगतात की, १९ व्या शतकात या देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब होती. लोकांना खायला अन्न नव्हते. तेव्हा एका स्पॅनिश धर्मगुरूने येशूची सतत ३ दिवस आणि रात्री प्रार्थना केली आणि या लोकांच्या भुकेची सोय करा, काही चमत्कार दाखवा अशी मनापासून प्रार्थना केली. तेव्हा एकाएकी अंधार दाटून आला आणि माशांचा पाउस पडला. तेव्हापासून दरवर्षी असा पाउस पडतो.

पावसातून माशांची बरसात होण्याअगोदर मुसळधार पाउस होतो, प्रचंड विजा कडाडतात, त्यामुळे त्यावेळी कुणी घराबाहेर पडत नाही. मात्र पाउस थांबला आणि हवा स्वच्छ झाली की लोक बकेट, भांडी घेऊन घराबाहेर येतात आणि मासे भरून घेतात. या प्रकारे त्यांना कोणतेही कष्ट न करताही सी फूडची मेजवानी मिळते.

Leave a Comment