घर बांधण्यासाठी अथवा इमारतीला भेगा पडल्यावर त्या भरण्यासाठी काँक्रिटचा वापर केला जातो. आता वैज्ञानिकांनी अशा काँक्रिटचा शोध लावला आहे जे स्वतःच भेगा भरेल व तुटल्यानंतर देखील पुन्हा आधीच्याच आकारात परत येईल. हे जिवंत काँक्रिट आहे. जे प्रकाश, ऊन आणि पाण्याद्वारे स्वतःला विकसित करते.
अमेरिकेच्या कोलोराडो यूनिवर्सिटीचे वैज्ञानिक डॉ. विल स्नुबर आणि त्यांच्या टीमने हे जिवंत काँक्रिट तयार केले आहे. हे काँक्रिट बनविण्यासाठी केवळ वाळू, सिमेंट आणि पाणीच नाही तर एका खास बॅक्टेरियाचा समावेश करण्यात आलेला आहे. हा बॅक्टेरियाच प्रकाश, ऊन आणि पाण्याद्वारे स्वतःला विकसित करतो. या काँक्रिटमुळे भिंतीच्या भेगा आपोआप भरल्या जातील.

या काँक्रिटमध्ये सायनोबॅक्टेरिया मिसळण्यात आला आहे. हा बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे स्वतःला विकसित करतो. डॉ. स्नूबर यांनी सांगितले की, जेव्हा काँक्रिट तयार केले जाते तेव्हा ते हिरव्या रंगाचे असते. मात्र नंतर त्याचा रंग कमी होत जातो. नंतर काँक्रिट तपकिरी रंगाचा दिसायला लागतो.
जे काँक्रिट विकसित करण्यात आले आहे, त्याद्वारे कार्बन उत्सर्जन कमी होते. या काँक्रिटला कोणताही आकार देता येतो.
बॅक्टेरियाद्वारे काँक्रिट बनविण्यासाठी यात गरम पाणी, वाळू, सिमेंटसोबत पोषक तत्व आणि जिलेटिन देखील टाकले. जिलेटिनमुळे बॅक्टेरिया वेगाने मजबूत काँक्रिट तयार करते. जर या काँक्रिटचा वापर एखाद्या भिंतीसाठी करण्यात आला व त्या भिंतीला भेगा पडल्यास प्रकाश व उन्हाच्या संपर्काने हे ती भेग भरून काढेल.

या काँक्रिटला वैज्ञानिकांनी 2 इंचच्या क्यूब्समध्ये बनवले. या क्यूब्सवर वैज्ञानिकांनी उड्या मारल्या तरी देखील ते तुटले नाही. या काँक्रिटद्वारे बनविण्यात आलेल्या विटांद्वारे घर बनवता येईल, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
तापमान आणि पाण्याच्या संपर्कात येताच काँक्रिट आपोआप विकसित होते. प्रत्येक विटेद्वारे 3 नवीन विट आपोआप बनू शकते. याला ‘लिव्हिंग बिल्डिंग मटेरियल’ नाव देण्यात आलेले आहे. भविष्यात यात प्लास्टिक अथवा ग्लास देखील जोडली जाऊ शकते.