नव्या विक्रमाला रोहितची गवसणी; सचिनलाही टाकले मागे !


राजकोट: एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा विक्रम भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने केला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगाने ७ हजार धावा केल्या.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहितने १८वी धाव घेताच त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगाने ७ हजार धावांचा विक्रम केला. कोणत्याही फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एवढ्या वेगाने ७ हजार धावांचा टप्पा गाठला नाही. या क्रमवारीत रोहितने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम अमला आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले.

१३७व्या डावात सलामीला येत रोहितने ७ हजार धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावा करण्यासाठी अमलाने १४७ डाव खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने १६० डावात ही कामगिरी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ९ हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. त्याने खालच्या क्रमांकावर देखील फलंदाजीकरत २ हजार धावा केल्या आहेत. रोहित २०१३ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्यास सुरूवात केली. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रोहितला खालच्या क्रमांकावरून थेट सलामीवीर म्हणून संधी दिली होती. रोहितने असा एकमेव फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ द्विशतक झळकावली आहेत.

Leave a Comment