या देशात भरावा लागतो सर्वाधिक आयकर


फोटो सौजन्य फिनापोलीस
भारताचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. दरवर्षी अर्थसंकल्प सादर होताना आयकरात किती सवलत दिली जाणार हा सर्वसामान्य माणसाच्या उत्सुकतेचा विषय असतो. आयकर मर्यादा वाढावी अशी साऱ्यांची इच्छा असते आणि या काळात कोणत्या देशात आयकर आकारलाच जात नाही त्यांची चर्चा सुरु होते. मात्र जगात असेही काही देश आहेत जेथे सर्वाधिक आयकर आकारला जातो.

केपीएमजीचा या संदर्भातला रिपोर्ट सांगतो, जगात सर्वाधिक आयकर स्वीडन येथे आकाराला जातो. या देशात ५७.१९ टक्के इतका वैयक्तिक आयकर आहे. तर या यादीत दोन नंबरवर जपान असून तेथे आयकर ५५.९५ टक्के इतका आकाराला जातो. ऑस्ट्रियामध्ये हा आयकर ५५ टक्के इतका आहे. आनंदी देश नेदरलँड्समध्ये ५१.७५ टक्के तर बेल्जियम मध्ये ५० टक्के आयकर आकाराला जातो.

अनेक देशात आयकर आकारताना व्यक्ती सिंगल आहे का विवाहित आणि मुले किती यावर आयकर ठरतो. काही देशात तुमचे वैयक्तिक उत्पन्न, मालमत्ता आणि सर्व प्रकारची गुंतवणूक यावर समान कर लावला जातो. बेल्जियम मध्ये सिंगल व्यक्तीवर सर्वाधिक म्हणजे ३९.८ टक्के कर असून मिळकत जास्त असेल तर कर वाढतो. तेथे सोशल सिक्युरिटी करही नागरिकांना भरावा लागतो.

नॉर्वे मध्ये २ मुले असलेल्या विवाहितांना जादा कर भरावा लागतो. सिंगल व्यक्तींना जास्त आयकर बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, ऑस्ट्रिया आणि हंगेरी येथे भरावा लागतो तर तुर्कस्तान, डेन्मार्क, फिनलंड, नेदरलँड्स आणि नॉर्वे येथे विवाहिताना जास्त आयकर भरावा लागतो.

Leave a Comment