प्रेममंदिरात भरणारा आशिकों का मेला


फोटो सौजन्य सत्योदय
भारत विविध संस्कृती आणि चालीरितीनी परिपूर्ण देश आहे. सध्याचे दिवस यात्रा जत्रांचे दिवस असून देशात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या जत्रा, यात्रा आणि मेळे भरू लागले आहेत, उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यतील भूरागड येथे दर मकर संक्रांतीला एक विशेष मेळा भरतो आणि त्याला अशिकोंका मेला म्हटले जाते. आशिक म्हणजे प्रेमाचा अनुरोध करणारा. केन नदी काठी भरणारा हा मेळा भूरागड किल्ल्याजवळ असलेल्या एका मंदिरात भरतो. प्रेमासाठी बलिदान केलेल्या प्रेमी जीवांची पार्श्वभूमी या मागे आहे.

प्रेमासाठी प्राणार्पण केलेला नट महाबली बीतन याची ही कथा. त्याचे येथे मंदिर बांधले गेले असून त्याला प्रेम का मंदिर असेच नाव आहे. दरवर्षी लाखोंच्या संखेने येथे प्रेमपुजारी येतात, प्रेमाच्या या देवाला खिचडीचा नैवैद्य अर्पण करतात आणि आपले प्रेम सिद्धीस जाऊदे अशी प्रार्थना करतात.


यामागची कथा अशी की ६०० वर्षापूर्वी महोबाचा अर्जुनसिंग या भूरागडचा किल्लेदार होता. मध्यप्रदेशातील सरबई गावातील एक नट या किल्ल्यात नोकरीसाठी आला. २१ वर्षीय या नटाचे नाव होते बीतन. तो अतिशय कुशल नट होता. या प्रदेशाच्या राजाची कन्या त्याच्या प्रेमात पडली. बीतन ब्रह्मचारी होता आणि तपस्वी नट होता. राजाला जेव्हा राजकन्या त्याचा प्रेमात पडल्याचे समजले तेव्हा त्याने बीतनला एक अट घातली. भूरागड समोर नदीपलीकडे असलेल्या बाम्बेश्वर किल्ल्यापासून बीतनने कच्चा दोर या किल्लावर बांधायचा आणि त्या दोरावरून चालत यायचे.

बीतन तयार झाला. कच्चा दोर बांधला गेला आणि बीतनची पावले दोरावरून चालू लागली. पण राज्यातील काही लोकांनी राजाला बीतन खरेच दोर पार करून येईल आणि राजकन्या त्याला द्यावी लागेल असे भय घातले तेव्हा राजाने एका बाजूने हा दोर कापून टाकला. बीतन उंचावरून खाली कोसळून मरण पावला आणि किल्ल्याच्या खिडकीतून हे दृश्य पाहत असलेल्या राजकन्येने त्याच्या प्रेमाला जागून खिडकीतून खाली उडी मारून जीव दिला. तेथे या दोघा प्रेमींची समाधी बांधली गेली त्यालाच प्रेम का मंदिर म्हणतात.

Leave a Comment