दिल्लीत शतायुषी मतदारांना मिळणार व्हीव्हीआयपी वागणूक - Majha Paper

दिल्लीत शतायुषी मतदारांना मिळणार व्हीव्हीआयपी वागणूक


फोटो फिनान्शियल एक्सप्रेस
येत्या ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत असून यंदा दिल्लीच्या मतदार यादीत १०० वर्षाहून अधिक वयाचे १२५ मतदार आहेत. हे मतदार मतदान करण्यासाठी आले तर त्यांना वाहन सुविधा देण्याबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे. ब्रांड अँबेसीडर सारखे त्यांना वागविले जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

निवडणूक आयोगाने यापूर्वीच ८० वर्षांच्या वरचे मतदार आणि दिव्यांगाना पोस्टल बॅलट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राजधानीत २.०४ लाख मतदार ८० वर्षाच्या पुढचे आहेत. त्यांना अथवा दिव्यांगाना मतदानासाठी यायचे असेल तर रँप, व्हीलचेअर पुरविली जाणार आहे. यंदा ७० विधानसभा क्षेत्रातील १-१ पोलिंग बुथचे संचालन सर्वस्वी महिला करणार आहेत. तसेच सर्व जिल्हात १-१ पोलिंग बुथ दिव्यांग सांभाळणार आहेत.

११ जानेवारीपर्यंत ज्यांनी मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांची नावे यादीत समाविष्ट केली जाणार आहेत मात्र २१ जानेवारी नंतर अर्ज करणाऱ्यांचे नाव यादीत समाविष्ट होणार नाही. यंदा प्रथमच कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना पोस्टल बॅलट सुविधेच लाभ घेता येणार आहे. मात्र त्यासाठी फॉर्म डी १२ भरावा लागेल. हा फॉर्म १४ ते १९ जानेवारी या मुदतीत भरता येणार आहे.

Leave a Comment