अपघात होण्यामागची काही प्रमुख कारणे – अशी घ्या खबरदारी


रस्त्यांवर चालत असलेल्या गाड्या दुर्घाटनाग्रस्त होऊन जीवितहानी झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, पहात असतो. या अपघातांमागे कारणेही वेगवेगळी असतात. अतिवेग, खराब हवामान, मद्यपानाच्या धुंदीत गाडी चालविणे, अश्या निरनिराळ्या कारणांमुळे गाडीवरचा चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातांमुळे किती तरी लोकांना गंभीर इजा होते, कित्येकांचे प्राणही जातात. त्यामुळे अपघातास आमंत्रण देणाऱ्या कृती न करता, आपल्या आणि दुसऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणे अगत्याचे आहे.

अनेकदा गाडी चालविताना चालक फोनवर बोलताना आढळतो, किंवा एखादा मेसेज आपल्या फोनवर टाईप करीत असतो. गाडी चालविताना मोबाईल फोन कडे लक्ष असणे, अपघाताला आमंत्रण आहे. कित्येक लोकांना गाडी चालविताना गाणी ऐकण्याची सवय असते. गाणी ऐकता ऐकता प्रवास चांगला होत असला हे जरी खरे असले, तरी गाण्याची सीडी बदलणे किंवा गाडीमधील रेडीयोचे ट्युनिंग, गाडी चालवीत असतानाच कशाला करायला हवे? आपल्याला हवी ती गाण्याची सीडी लावायची असल्यास किंवा रेडीयो आपल्या पसंतीच्या वाहिनीवर ट्यून करावयाचा असल्यास गाडी रस्त्याच्या कडेला उभी करूनही ही कामे करता येतील. किंबहुना हाच सुरक्षित पर्याय आहे. फोनवर बोलताना, मेसेज टाईप करताना, किंवा गाणी लावताना केवळ काही क्षणांसाठी विचलित झालले आपले चित्त, अपघातास निमित्त ठरू शकते. काही महिलांना गाडी चालवत असताना आपली हेअर स्टाईल ठीकठाक करण्याची किंवा सतत आरशामध्ये बघून मेकप करण्याचीही सवय असते. ह्या सवयीही घातक ठरू शकतात.

मद्यपान केल्यानंतर गाडी चालविल्याने गाडीवरील ताबा सुटून झालेले अपघात तर जवळजवळ रोजच घडत असतात. या बाबीत आताच्या काळामध्ये बरचसे लोक खबरदारी घेताना दिसत आहेत, तसेच वाहतूक पोलीसही याबाबत सचेत रहात असल्याने ह्या कारणाने घडणाऱ्या अपघातांच्या संख्येमध्ये काहीशी घट झालेली दिसत असली, तरी आज ही मद्याच्या धुंदीत गाडी चालविणे हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. गाडी चालविताना मद्यपान करणे टाळायलाच हवे. किंवा मद्यपान केल्यानंतरही गाडी चालविणे टाळायला हवे. प्रवास करणे अपरिहार्य असेल, तर मुळात मद्यपानच टाळणे हा उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे पुरेशी विश्रांती झाली नसल्यास, किंवा झोप अपुरी राहिली असल्यासही गाडी चालविणे टाळायला हवे. चालकाला लागलेली काही क्षणांची डुलकी गाडीमधील लोकांसाठी आणि गाडीच्या आसपास असणाऱ्यांसाठी प्राणघातक ठरू शकते.

गाडीच्या वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने गाडीवरचा ताबा सुटून अपघात होणे हे अपघातांमागचे सर्वात प्रमुख कारण आहे. गाडी अतिशय वेगामध्ये असताना अचानक समोर कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास गाडीवर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन बसते. गाडीचे ब्रेक्स कितीही उत्तम स्थितीमध्ये असले तरी मुळातच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला तर अपघात टाळणे कठीण होते. असे अपघात टाळण्यासाठी रस्ता किती ही मोकळा दिसत असला तरी वेगमर्यादा ओलांडण्याचा मोह टाळायला हवा. त्याचप्रमाणे खराब हवामान असतानाही गाडी चालविणे टाळायला हवे. अतिवृष्टी किंवा थंडीच्या काळामध्ये खूप धुके असताना गाडी चालविताना वेगमर्यादा सांभाळावी.

अनेकदा गाडीच्या यंत्रणेत अचानक काही बिघाड झाल्याने ही अपघात होण्याची शक्यता असते. गाडीची टायर्स जुनी असली तर त्यांची ‘ ग्रिप ‘( पकड ) कमी झालेली असते. अशी टायर्स निसरड्या रस्त्यावर घसरल्याने अपघात होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आपल्या गाडीच्या टायर्स ची नियमित तपासणी करून घ्यावी, आणि टायर्स जुनी झाल्यानंतर ती बदलावीत. कित्येकदा गाडीच्या यंत्रणेतील काही छोटे मोठे बिघाड दुरुस्त करून घेण्याचे आपण वेळेअभावी किंवा ‘ नंतर बघू ‘ असा विचार करून टाळत असतो. पण हे छोटे छोटे बिघाड कोणत्याही मोठ्या बिघाडाला कारणीभूत ठरू शकतात. गाडीमध्ये असे उद्भविलेले मोठे बिघाड अपघातांसाठी निमित्त ठरू शकतात. त्यामुळे आपल्या गाडीच्या लहान लहान दुरुस्त्या ही वेळच्यावेळी, विशेषतः लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी अवश्य करून घ्याव्यात.

Leave a Comment