हात-पाय तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही; राऊतांचे उदयनराजेंना प्रत्युत्तर


मुंबई : माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत तंगड्या तोडण्याची भाषा चालत नाही, तंगड्या सगळ्यांना असतात, हे लक्षात ठेवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे एक पुस्तक भाजप नेता जय भगवान गोयल यांनी प्रकाशित केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या पुस्तकाला जोरदार विरोध केला होता. त्याचबरोबर भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनादेखील त्यास विरोध करण्याचे आवाहन केले होते. परंतु भाजपला सवाल करण्याऐवजी संजय राऊतांवर उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीमध्ये हातपाय तोडण्याची भाषा चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची व्यक्तीगत मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांची वारसदार असल्यामुळे छत्रपती शिवाजी मराहाजांवर सर्वांचा अधिकार आहे.

उदयनराजेंना उद्देशून संजय राऊत म्हणाले की, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात. म्हणून तुमचा आदर आम्ही करतो. परंतु तुम्ही हात-पाय तोडण्याची भाषा करु नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कोणी अशी भाषा केली असती तर महाराजांनी त्याचेही हातपाय तोडले असते.

Leave a Comment