संजय राऊत यांनी मागे घेतले इंदिरा गांधी-करीम लाला भेटीचे वक्तव्य


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी-करीम लाला भेटीच्या वक्तव्यावर माघार घेतली आहे. त्यांचा या संदर्भातील खुलासा समोर आला आहे. मुंबईचा इतिहास ज्यांना माहित नाही अशांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, जे वक्तव्य मी केले त्यामधून इंदिरा गांधी यांचा अनादार केला असे जर कुणाला वाटत असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याबाबत आमच्या सहकारी काँग्रेसच्या मित्रांनी नाराज होण्याची गरज नसल्याचेही संजय राऊत म्हणाले.

पठाण समाजाचा करीम लाला हा नेता होता. तो पख्तुन-ए-हिंद नावाची संघटनाही चालवत होता. त्याच्या संघटनेची ताकद एवढी होती की अनेक बडे आणि दिग्गज नेते त्याला भेटण्यासाठी येत. इंदिरा गांधींचाही ज्यामध्ये समावेश होता. पण जे मी बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. इंदिरा गांधी, पंडित नेहरु आणि गांधी घराण्यातील प्रत्येक नेत्याबाबत मला आदर आहे. कोणत्याही वेगळ्या अर्थाने ही बाब मी बोललो नाही. पण माझे वक्तव्य इतिहास माहित नसलेल्या प्रसारमाध्यमांनी ट्विस्ट केल्याचे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा दिला आहे.

आयर्न लेडी म्हणून भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या ओळखल्या जायच्या. त्यांच्याविषयी माझ्याही मनात याच भावना आहेत. त्यांचा अनादर व्हावा हा हेतू मनात ठेवून मी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मुंबईचा इतिहास ज्या प्रसारमाध्यमांना माहित नाही माझ्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास केला असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. १५ जानेवारी रोजी एका जाहीर मुलाखतीत इंदिरा गांधी या करीम लालाची भेट घेण्यासाठी मुंबईत येत असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ज्यानंतर बराच वाद निर्माण झाला. ज्यावर आता संजय राऊत यांनी आपण त्या अर्थाने बोललोच नव्हतो असं म्हणत खुलासा केला आहे.

Leave a Comment