जावईशोध : भारतीय चलनावर छापा लक्ष्मीदेवीचा फोटो, रूपया होईल मजबूत


नवी दिल्ली – डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणाऱ्या घसरणीबाबत भारतीय जनता पक्षाचे नेता आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. सुब्रमण्यम स्वामी भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी नोटांवर लक्ष्मी देवीचे फोटो छापण्याच्या बाजूने आपण असल्याचे म्हणाले आहेत.

मंगळवारी रात्री मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांचे भाषण झाले. स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला विषयावर भाषण झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना इंडोनेशियाच्या चलनावर भगवान गणेशाचे छायाचित्र असल्याकडे पत्रकारांनी स्वामींचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर स्वामी देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदीच या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकतात. यासाठी माझे समर्थन आहे. भगवान गणेश विघ्नहर्ता आहेत. मी तर असे म्हणेन की भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी आपल्या नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापले जावे. कोणालाही याबद्दल वाईट वाटू नये, असे स्वामी म्हणाले.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्यात (सीएए) काहीच आक्षेपार्ह नाही. सीएएचे काँग्रेस आणि महात्मा गांधींनीही समर्थन केले होते. 2003 मध्ये सीएए आणण्याची विनंती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही केली असल्याचेही स्वामी पुढे म्हणाले. त्यावर बोलताना पुढे म्हणाले, भारतातील वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय नसून, लोकसंख्येचा उत्पादकता म्हणून वापर करण्यासाठी लोकांना शिक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच आहे, दोघांचे वंशजही एकच असल्याचेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले.

Leave a Comment