तलवारबाजीत पत्नीला हरवून देणार घटस्फोट, पतीची अजब मागणी

कधीकधी घटस्फोटाची अशी विचित्र प्रकरण समोर येतात की, ज्यामुळे न्यायालय देखील हैराण होते. असेच एक विचित्र घटस्फोटाचे प्रकरण अमेरिकेत समोर आले आहे. येथे घटस्फोटाची सुनावणी सुरू असताना व्यक्तीने न्यायालयात चक्क जापानी तलवारची मागणी केली. जेणेकरून तो तलवारबाजीमध्ये आपल्या पत्नीला हरवून घटस्फोट घेऊ शकेल.

हे विचित्र प्रकरण अमेरिकेच्या कॅन्सास शहरातील असून, व्यक्तीचे नाव डेव्हिड ऑस्ट्रॉम आहे.

डेव्हिड आणि त्याची पत्नी बिग्रेट ऑस्ट्रॉमच्या घटस्फोटाची सुनावणी शेल्बी काउंटी न्यायालयात सुरू होती. यावेळी न्यायाधीश असलेले क्रेग ड्रिसमायर यांच्याकडे डेव्हिडने मागणी केली की, त्याला आपल्या पत्नीशी तलवारबाजी करायची आहे व त्यात तिला हरवायचे आहे. यासाठी त्याने जापानी तलवारीची मागणी देखील केली.

डेव्हिडच्या या मागणीमुळे न्यायालय देखील हैराण झाले. तो म्हणाला की, अमेरिकेत युद्धाद्वारे कोणत्याही निकालाचा निर्णय लावण्याची प्रथा बंद झालेली नाही. 1818 मध्ये ब्रिटिश न्यायालयाने देखील ‘ट्रायल बाय कॉम्बॅट’चा उपयोग केल्याचे देखील उदाहरण डेव्हिडने दिले. डेव्हिडची ही मागणी न्यायालय स्विकारण्याची शक्यता खूप कमी आहे. याआधी देखील अनेकांनी अशी मागणी केली होती, मात्र न्यायालयाने यासाठी नकार दिला होता.

1776 मध्ये अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत ट्रायल बाय कॉम्बॅट कायदा रद्द करण्यात आलेला नाही. अमेरिकेला हा कायदा ब्रिटिशांकडून मिळाला आहे. या कायद्याचा अर्थ होतो की, कोणत्याही प्रकरणाचा निर्णय हा लढाईद्वारे केला जातो.

Leave a Comment