नाव शहेनशाह : रोज ४० लीटर दूध पीतो


हैदराबादचा शहेनशहा. वय साडेचार वर्षे, उंची साडे सहा फूट. महिन्याचा खर्च एक लाख रुपये. त्यात दररोज ४० लीटर दूध. १०० सफरचंद आणि सात ते आठ किलो सुका मेवा. वर्षाची कमाई आठ ते दहा लाख रुपये. हे कोणा खर्‍याखुर्‍या शहेनशहाचे वर्णन नाही. ते आहे एका रेडयाचे वर्णन. महंमद आलमखान यांच्या मालकीचा हा रेडा जन्माला आला तेव्हाच त्याच्यात एवढे मोठे होण्याची क्षमता आहे हे लक्षात आले म्हणून त्यांनी एका मोठ्या शेतकर्‍याची मदत घेऊन या शहेनशहाचे लालनपालन छान करण्याची योजना आखली. अर्थात अशा मोठ्या रेड्याला पाळायचे असेल तर त्याचे खाणे काय असले पाहिजे आणि त्याची जोपासना कशी केली पाहिजे याची त्यांना फारशी माहिती नव्हती.

त्यांना हरियाणातल्या हिस्सार जिल्ह्यातील ईश्रसिंग यांच्या रेड्याची माहिती मिळाली. तोही असाच विक्रमी रेडा आहे. त्याचे नाव आहे युवराज. तोही असाच मोठा दांडगा आहे. त्याला दररोज पाच किलो सुका मेवा खायला घालावा लागतो. दररोजचा कडबा आणि गवत खाल्ल्यानंतरचा हा खुराक आहे. त्याचा वापर पैदाशीसाठी केला जातो. पण युवराज दररोज केवळ २० लीटर दूध पितो. त्याच्यापासून देशाच्या विविध भागातल्या एक लाख ५० हजार गायींच्या पोटी वासरे जन्माला आली आहेत. त्यापासून त्याला वर्षाला आठ लाख रुपये मिळतात. त्याला दररोज मोहरीच्या तेलाने मर्दन करावे लागते. त्याला दिल्लीतल्या एक शेती प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटन करून ते जाणार होते पण त्यांना कोणी तरी या रेड्याची माहिती दिली. त्यावर मोदी त्याला बघायला त्याच्या स्टॉलवर आले|

या युवराजची सारी माहिती घेऊन हैदराबादच्या शहेनशहाचा आहाराचा कार्यक्रम तयार करण्यात आला. युवराज २० लीटर दूध पीतो पण शहेनशहाला ४० लीटर दूध लागते. आजवर त्याने जनावरांच्या नऊ प्रदर्शनात बक्षिसे मिळवली आहेत. युवराज आणि शहेनशहा यांच्यावर अनेकांच्या नजरा आहेत. २०१४ साली युवराजला ९ कोटी रुपयांची मागणी आली होती. अर्थात त्याच्या मालकांनी त्याला विकले नाही. म्हणून युवराजची बोली चढत गेली. गतवर्षी त्याला १५ कोटी आणि नंतर २१ कोटी रुपयांची मागणी आली. आता शहेनशहा तर त्याच्यापेक्षा भारी आाहे. त्याला कोणी मागणीच घातली नाही कारण त्याचा मालक त्याला विकायला तयार नाही हे सर्वांना माहीत आहे पण तरीही काही लोक शहेनशहाला २५ कोटी रुपये द्यायला तयार आहेत.

Leave a Comment