दुखापतग्रस्त ऋषभ पंत दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकणार


राजकोट – राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मुकणार आहे. पंतच्या डोक्याला मुंबईच्या वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चेंडू लागला होता.

दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी १७ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. पण, त्याला बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अ‌ॅकॅडमीमध्ये तंदुरूस्तीसाठी पाठवले जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. पंत पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४४ व्या षटकात फलंदाजी करत असताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता. त्यानंतर उर्वरित सामन्यात त्याने यष्टीरक्षण केले नव्हते. पंतने या सामन्यात २ चौकार आणि एका षटकारासह २८ धावांची खेळी केली. त्याला कमिन्सने माघारी धाडले होते.

ऑस्ट्रेलियाने वानखेडे येथे पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला दहा गडी राखून धूळ चारली. भारताच्या गोलंदाजांना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अ‌ॅरोन फिंच यांनी आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला ५ वेळा १० गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. सर्वात पहिल्यांदा असा पराभव न्यूझीलंड संघाने केला आहे. १९८१ मध्ये न्यूझीलंड संघाने भारताला १० गडी राखून धूळ चारली होती.

Leave a Comment