उत्तराखंड मधील प्राचीन कटारमल सूर्य मंदिर


फोटो सौजन्य कॅलीडोस्कोप
उत्तराखंड या राज्याला निसर्गाचे अपूर्व देणे लाभले आहे. हिमाच्छादित शिखरे, डोंगरदऱ्या, वेगवान नद्या, थंडगार हवा यामुळे तेथे पर्यटकांची गर्दी झाली नाही तरच नवल. त्यात या राज्यात अनेक प्राचीन वास्तू आहेत. त्यातील एक आहे ९०० वर्षे जुने कटारमल सूर्य मंदिर. भारतीय पुरातत्व विभागाने हे मंदिर संरक्षित वास्तू म्हणून जाहीर केले आहे. हे मंदिर म्हणजे मंदिराचा समुह असून ही सर्व मंदिरे ११ ते १३ या दोन शतकात बांधली गेली आहेत.

या मंदिराला बद आदित्य सूर्य मंदिर असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या मंदिरात असलेली सूर्याची प्रतिमा धातू अथवा दगडाची नसून ती वडाच्या झाडाच्या लाकडापासून बनविलेली आहे. गर्भगृह प्रवेशद्वार सुद्धा लाकडी आणि अतिशय बारीक कोरीवकामं असलेले असून सध्या हे द्वार दिल्लीच्या म्युझियम मध्ये आहे. समुद्रसपाटीपासून २११६ मीटर उचीवर असलेल्या अल्मोडा मध्ये हे कटारमल सूर्य मंदिर आहे.


हे मंदिर याप्रकारे बांधले गेले आहे की सूर्याची पहिली किरणे मंदिरातील शिवपिंडीवर पडतात. मंदिरांच्या भिंती दगडी असून सूर्य मंदिर भवन मध्ये शिवपार्वती, लक्ष्मी नारायण, गणेश यांच्याही प्रतिमा आहेत. ही मंदिरे म्हणजे वास्तू कलेचा बेजोड नमुना आहेत. प्रमुख मूर्ती आदित्य सूर्याची असून शक राजे तिचे उपासक होते असे सांगतात. सूर्याची आणखी एक पद्मासनातील मूर्ती येथे पहावयास मिळते. ती १ मीटर उंचीची असून भुऱ्या दगडात कोरली गेली आहे.

या मंदिर समुहात छोटी मोठी ४५ मंदिरे आहेत. अर्थात ती २०० वर्षाच्या काळात बांधली गेली आहेत. येथील स्थानिक सांगतात या मंदिरात हिमालयातील सर्व देवदेवता एकत्र येऊन पूजा करतात असा भाविकांचा विश्वास आहे.

Leave a Comment