शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजेंनी पहिले आणावेत – संजय राऊत


मुंबई – भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजेंनी आणावेत असा टोला लगावला आहे. शिवसेनेवर टीका करताना उदयनराजे यांनी शिवेसेनेने पक्षातून शिव शब्द काढून ठाकरे सेना असे नाव करावे असा टोला लगावला होता. शिवाजी महाराजांच्या नावाचा शिवसेनेकडून वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. उदयनराजे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावे लागत नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आम्ही आदर करतो. जिथे महाराजांचे नाव येते आम्ही तिथे नतमस्तक होतो. बाळासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या नावाने एकजुटीचे काम पुढे नेल्याचेही यावेळी ते म्हणाले.

यावेळी शरद पवार जाणते राजे असल्याचे सांगत संजय राऊत यांनी उदयनराजेंच्या टीकेचा समाचार घेतला. शरद पवार हे जाणते राजे आहेतच. त्यांना ही उपाधी जनतेने दिली आहे. शिवसेना प्रमुख स्वत: म्हणाले नाहीत की आपण हिंदूह्रदयसम्राट आहोत. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, लोकांनी त्यांना राजा मानले. महाराष्ट्रात देशासाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस जनतेचा राजा आहे. आम्हीही शरद पवारांना तो मान देतो, असे उत्तर यावेळी त्यांनी दिले.

Leave a Comment