शरद पवार हे ‘जाणता राजा’ असल्याचे नरेंद्र मोदींनीच मान्य केले


मुंबई – भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर भूमिका मांडताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यांनी पवारांना जाणता राजा कसे म्हणता? असा प्रश्न उपस्थित केला होता. शिवसेनेने त्यावरून मुनगंटीवारांना टोला लगावला आहे. एक बाळबोध प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे. पवारांच्या बाबतीत ‘जाणता राजा’ हे नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले असल्यामुळे मोदीच मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देतील, म्हणत शिवसेनेने मुनगंटीवारांवर टीका करताना शरद पवारांचे कौतूक केले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या वादाला शिवसेनेने पूर्णविराम दिला. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर टीका करण्याची संधी देखील सोडली नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुस्तकाच्या वादात जाणते राजे होते. मग शरद पवारांना जाणता राजा कसे म्हणता असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हा प्रश्न विचारण्याचा सल्ला शिवसेनेने मुनगंटीवार यांना दिला आहे.

एक बाळबोध प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे, पवारांना जाणता राजा कसे म्हणता? हा प्रश्न त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा. ‘रयतेचा राजा’ असे छत्रपती शिवरायांना संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत खडान्खडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे ‘जाणता राजा’ हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले असल्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील.

आज के शिवाजी : नरेंद्र मोदी या पुस्तकावरून भडकलेल्या वादाची आग पवार जाणता राजा कसे? असा प्रश्न उभा केल्याने कमी होणार नाही. भाजपच्या काही नेत्यांच्या मागेही मधल्या काळात ‘जाणते राजे’ अशा उपाध्या हौसेने लावण्यात आल्या. पण कुठे शिवाजी राजे व कुठे हे सर्व हवशे नवशे गवशे!, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे.

Leave a Comment