दरवर्षी 15 जानेवारीला देशात सैन्य दिवस साजरा केला जातो. यंदाचे हे 72वे वर्ष आहे. 1949 ला आजच्याच दिवशी भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रांसिस बुचर यांच्या स्थानावर तत्कालिन लेफ्टिनेंट जनरल के एम करियप्पा हे भारतीय सैन्याचे कमांडर इन चीफ झाले होते. करियप्पानंतर फील्ड मार्शल देखील झाले. भारतीय सैन्याची स्थापना 1776 ला ईस्ट इंडिया कंपनीने कोलाकात्यात केली होती. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत.
या दिनानिमित्ताने सैन्याची अनेक पथके रेजिमेंट परेडमध्ये सहभागी होतात. यासोबतच अनेक चित्ररथ देखील असतात.

केएम करियप्पा हे पहिले असे अधिकारी आहेत, ज्यांना फील्ड मार्शल ही उपाधी देण्यात आली होती. त्यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धामध्ये भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. त्यांना 28 एप्रिल 1986 ला फील्ड मार्शल रँक देण्यात आली होती.
दुसऱ्या विश्वयुद्धात बर्मामध्ये जापानला पराभूत करण्यासाठी त्यांना ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित करण्यात आले होते. ते 1953 ला निवृत्त झाले. 1993 मध्ये 94 वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले.

भारतीय भूदलाची सुरूवात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याच्या रुपात झाली होती. त्यानंतर ते ब्रिटिश भारतीय सैन्य झाले व नंतर त्याला भारतीय भूदल सैन्य असे नाव देण्यात आले.

मागील वर्षी सैन्य दिनाच्या निमित्ताने परेडचे नेतृत्व एका महिला अधिकाऱ्याने केले होते. लेफ्टिनेंट भावना कस्तूरी यांनी सैन्याचे नेतृत्व केले होते. सैन्य दिनाच्या निमित्ताने सैन्य प्रमुखांना सलामी दिली जाते. मात्र यंदा पहिल्यांदाच सैन्य प्रमुखांऐवजी सीडीएस जनरल बिपिन रावत यांना सलामी देण्यात आली.