
कोल्हापूर – इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात काही गैर नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे आणि लेखक जय भगवान गोयल यांचे समर्थन करत गोयल यांच्या या पुस्तकाबद्दल आकांडतांडव होण्याचे काही कारण नसल्याचे म्हटले आहे.
भाजपचे माजी आमदार म्हणतात; शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करणे गैर नाही
शनिवारी भारतीय जनता पक्ष्याच्या दिल्ली कार्यालयात पार पडलेल्या सांस्कृतिक संमेलनात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. काँग्रेस आणि शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी या पुस्तकावर सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपवर टीकेची झोड उठवली होती. अशातच भाजपच्या माजी आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
एकीकडे या पुस्तकाची भाजप नेते जबाबदारी झटकत असताना भाजपच्या माजी आमदाराकडून गोयल यांचे समर्थन करण्यात आले आहे. सुरेश हाळवणकर यांनी हे वक्तव्य कोल्हापुरात आयोजित भाजप पदाधिकारी निवड कार्यक्रमप्रसंगी केले आहे.
