मागील काही वर्षात केंद्र सरकारने डिजिटल इंडियाला मोठे प्रोत्साहन दिले आहे. आज गुगल प्ले स्टोर आणि अॅप स्टोरमध्ये असे अनेक सरकारी अॅप्स आहेत, ज्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. या अॅप्सविषयी जाणून घेऊया.

डिजीलॉकर (DigiLocker) –
हे अॅप गुगल प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवर देखील उपलब्ध आहे. लोक या अॅपमध्ये महत्त्वपुर्ण कागदपत्रे जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड डिजिटल फॉर्मेटमध्ये ठेऊ शकतात. यामध्ये कॉलेजचे सर्टिफिकेट देखील ठेवता येतात. यामुळे लोकांनी नेहमी आपल्यासोबत कागदपत्रे बाळगण्याची गरज राहत नाही.

हिम्मत प्लस (Himaat Plus) –
सरकारने हे अॅप खास महिलांचे सुरक्षेसाठी सादर केले आहे. या अॅपचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात प्रथम दिल्ली पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्टरेशन करावे लागेल. या अॅपद्वारे तुम्ही अडचणीच्या स्थितीत अलर्ट पाठवू शकता व याची माहिती थेट दिल्ली पोलीस कंट्रोल रुमला मिळेल. दिल्ली पोलिसांना या अलर्टमध्ये युजरची लोकेशन आणि ऑडिओ ही माहिती देखील मिळेल.

एम आधार (M Aadhaar) –
यूआयडीएआयचे एम-आधार अॅप खूपच फायदेशीर आहे. या अॅपमध्ये आधार कार्ड डिजिटल फॉर्मेटमध्ये ठेवता येते. याशिवाय बायोमॅट्रिक माहिती देखील सुरक्षित ठेवता येते.

माय गव्हर्मेंट (My Gov) –
सरकारच्या या अॅपद्वारे तुम्ही विभाग आणि मंत्रालयांना सुचना, सल्ला देऊ शकता. जर कोणत्याही योजनेबद्दल तुमच्याकडे काही नवीन कल्पना असेल तर तुम्ही या अॅपद्वारे सरकारला पाठवू शकता.

वोटर हेल्पलाईन (Voter Helpline) –
लोकांना या अॅपद्वारे निवडणुकीसंबंधी सर्व माहिती मिळते. युजर्सला उमेदवाराची देखील माहिती मिळते. युजर्स मतदान यादीत देखील याद्वारे स्वतःचे नाव तपासू शकतात.