हजार वर्षापूर्वी १ जानेवारीला होती संक्रांत


फोटो सौजन्य आशियानेट
मकरसंक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. आज म्हणजे १५ जानेवारीला देशभर हा सण साजरा होत आहे. या दिवशी सूर्य धून राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याचा उत्तरायण प्रवास सुरु होतो. गेली काही वर्षे १४ जानेवारीला येणारी संक्रांत आता १५ जानेवारीला येत असून या पुढे काही वर्षांनी १५ किंवा १६ जानेवारीला संक्रांत येईल.

काशी हिंदू विश्वविद्यालयाचे पंडित गणेश शर्मा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, पहिली १४ जानेवारीची संक्रांत १९०२ साली आली होती. तर १८ व्या शतकात संक्रांत १२ व १३ जानेवारीला येत होती. १ हजार वर्षापूर्वी संक्रांत १ जानेवारीला येत होती तर ५००० वर्षानंतर संक्रांत फेब्रुवारी अखेरी येईल. सूर्य ज्या वेगाने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाईल त्यावर संक्रांत कधी येणार हे ठरत असते. १९६४ मध्ये प्रथम संक्रांत १५ जानेवारीला आली. २०७७ साली १४ जानेवारीला होणारी संक्रांत त्या तारखेची शेवटची असेल म्हणजे त्यानंतर संक्रांत १४ जानेवारीला कधीच येणार नाही.

राजा हर्षवर्धनच्या काळात संक्रांत २४ डिसेंबरला आली होती तर अकबर शासन काळात संक्रांत १० जानेवारीला होती. शिवाजी राजांच्या काळात ११ जानेवारीला होती. प्रत्येक वर्षी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि प्रत्येक वर्षी हा प्रवेश २० मिनिटे उशिरा होतो. ३ वर्षातून एकदा हा प्रवेश १ तास उशिरा होतो आणि ७२ वर्षातून हा उशीर एक दिवस इतका असतो. सूर्याची गती दरवर्षी २० सेकंदाने वाढते आहे त्यामुळे २०७७ नंतर दरवर्षी १५ किंवा १६ जानेवारीला संक्रांत येईल.

भारताबरोबरच मकर संक्रांत नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, कंबोडिया, थायलंड या देशात विविध नावांनी साजरी केली जाते.

Leave a Comment