जगात या एकमेव क्रिकेटरला झाली होती फाशी


फोटो सौजन्य कॅच न्यूज
निर्भया केस मधील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दिवस जसा जवळ येत चालला आहे तसे फाशीविषयी विविध माहिती पुढे येत आहे. क्रिकेट हा वास्तविक जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जातो. मात्र आजकाल तशी परिस्थिती नाही. त्यामुळे गैरवर्तन केलेल्या अनेक खेळाडूना दंड ठोठावला जात असल्याचे वारंवार ऐकायला मिळते. मैदानाबाहेरही खेळाडू अनेकदा गैरवर्तन करताना दिसतात. क्रिकेटच्या इतिहासात एका क्रिकेटपटूला फासावर चढविले गेल्याची नोंद आहे.

एस्ली जॉर्ज हिल्टन असे या क्रिकेटपटूचे नाव. तो जमैकाचा खेळाडू. त्याने वेस्ट इंडीज संघातर्फे १९३५ ते ३९ या काळात सहा कसोटी खेळल्या होत्या. १९५५ मध्ये त्याला पत्नीच्या खुनाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा दिली गेली. हिल्टन गरीब कुटुंबातून आलेला होता. १९२७ मध्ये त्याला जमैका क्रिकेट टीमचे सदस्यत्व मिळाले पण पहिला सामना खेळण्यासाठी त्याला १९३५ पर्यंत वाट पहावी लागली होती. त्याने इंग्लंड विरुद्ध चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती.

हिल्टनची आणि पोलीस इन्स्पेक्टरची मुलगी लुर्लाईन रोज हे दोघे प्रेमात पडले आणि घरच्यांचा विरोध पत्करून विवाहबद्ध झाले ते वर्ष होते १९४२. त्यांना १९४७ साली मुलगा झाला. रोजला फॅशन डिझायनिंगची आवड होती आणि त्यानिमित्ताने ती वारंवार न्युयॉर्क येथे जात असे. एकदा न्युयॉर्क वरून हिल्टनला त्याच्या बायकोचे रॉय फ्रान्सिस बरोबर लफडे असल्याची तार आली. हिल्टनने पत्नीला त्याबद्दल विचारले तेव्हा तिने प्रथम नकार दिला पण नंतर असे संबंध असल्याची कबुली दिली. तेव्हा हिल्टनने तिला बंदुकीतून सात गोळ्या घातल्या आणि स्वतःच पोलिसांना बोलावून घेतले.

हिल्टनला वाचविण्याचा प्रयत्न त्याच्या टीमचा कप्तान आणि वकिलांनी केला पण त्याचा उपयोग न होता हिल्टनला न्यायालयाने फाशी सुनावली आणि १९५५ मध्ये ही शिक्षा अमलात आणली गेली.

Leave a Comment