भारतातील स्थिती दुःखद – सत्या नडेला

नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून सध्या देशभरात आंदोलन सुरू आहे. आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील भारतातील ही स्थिती दुःखद असल्याचे म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्टच्या एका कार्यक्रमात बझफीडचे संपादक बेन स्मिथ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. सीएएविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नडेला म्हणाले की, मला वाटते की जे काही होत आहे ते दुःखद आहे. जर एखादा बांगलादेशी शरणार्थी भारतात आला व आपल्या कामामुळे इन्फोसिसचा पुढील सीईओ झाला तर मला ते नक्कीच आवडेल.

सत्या नडेला हे मूळ भारतीय वंशाचे असून, त्यांचा जन्म हैदराबाद येथे झालेला आहे. नडेला म्हणले की, मला ज्या ठिकाणी सांस्कृतिक वारसा मिळाला, त्याचा मला गर्व आहे. मी हैदराबादमध्ये मोठा झालो. मला नेहमी वाटते की, ही जागा मोठे होण्यासाठी सर्वात चांगली आहे. आम्ही ईद, ख्रिसमस आणि दिवाळी साजरी करायचो. हे तिन्ही सण आपल्यासाठी मोठे आहेत.

यासोबतच गूगल, उबर, अॅमेझॉन आणि फेसबुक सारख्या दिग्गज टेक कंपन्यांमध्ये कार्यरत 150 पेक्षा अधिक भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्यांनी सीएए व एनआरसीच्या विरोधात पत्रे लिहिली आहेत. या पत्रात त्यांनी सत्या नडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई आणि रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर सार्वजनिक रित्या टीका करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment