प्रजासत्ताकदिनी अपाचे, चिनूक प्रथमच फ्लायपास करणार


फोटो सौजन्य भारतवर्ष
२६ जानेवारीला देशात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या परेडची जोरदार तयारी सुरु असून हवाई दलात नुकतेच सामील झालेले लढाऊ हेलीकॉप्टर अपाचे आणि वाहतूक हेलीकॉप्टर चिनूक प्रथमच फ्लायपास मध्ये सामील होणार आहेत. या संदर्भात हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी माहिती दिली.

या फ्लायपास संदर्भात सांगताना ते म्हणाले वाहतुकीसाठी उत्तम असलेली चिनूक हेलीकॉप्टर वीक फोर्मेशन मध्ये म्हणजे एक पुढे व बाकी दोन बाजूला पण थोडी मागे अशी उडतील. तर ५ नवीन लढाऊ अपाचे हेलीकॉप्टर अॅरो फॉर्मेशनमध्ये उडतील. यंदाच्या संचलनात हवाई दलाचा रथ सामील असेल त्यात राफेल बरोबर स्वदेशी तेजसची झलक पाहायला मिळेल. हलकी लढाऊ हेलीकॉप्टर तसेच जमिनीवरून आकाशात मारा करू शकणारी आकाश आणि अस्त्र ही मिसाईलही दिसणार आहेत.

या एअरशोची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ९०० स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम होणार आहे. इंदिरा गांधी विमानतळावरच्या तिन्ही टर्मिनसवरून १८ जानेवारी, २० ते २४ जानेवारी आणि २६ जानेवारीला सकाळी १०.३५ ते दुपारी १२.१५ पर्यंत एकाही फ्लाईट उडणार नाही तसेच उतरणार नाही असे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment